पाऊस आला तरी नाले तुंबलेले, मॅनहोल उघडे; शिवसेनेने विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्याआधी १३० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासन आणि सत्ताधारी करीत असताना प्रत्यक्षात बहुतांशी नाले अजूनही गाळ आणि कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत. शिवाय अनेक मॅनहोल उघडे असल्याने धोकादायक बनल्याचे सांगत शिवसेना आमदार अॅड. अनिल परब यांनी विधान परिषदेत आज सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

मुंबईत पावसाळ्याआधी ८० टक्के, १० टक्के पावसाळ्यात तर १० टक्के नालेसफाई नंतर केली जाते. मात्र प्रशासनाने पावसाळ्याआधीच १३० टक्के नालेसफाईची आकडेवारी कशी जाहीर केली, असा सवाल त्यांनी केला. प्रत्यक्षात
४० टक्केदेखील नालेसफाई झाली नसल्याचे सांगत त्यांनी आपल्याकडे फोटोच असल्याचे सांगितले. त्यामुळ टक्केवारीचे आकडे जाहीर करणाऱ्या पालिकेने नाले उलटे करून साफ केले का, असा टोलाही त्यांनी लगावला. नालेसफाईसाठी पालिकेने २०९ कोटी रुपये खर्च केला आहे. तरीदेखील पहिल्याच पावसात ‘मुंबईची तुंबई’ झाली.

महापौरांच्या पाहणी दौऱ्यात त्यांच्यासमोरच अधिकारी मॅनहोलमध्ये कोसळला, हे दुर्दैवी असल्याचा टोलाही अनिल परब यांनी लगावला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबई थांबली तर देश थांबेल. यासाठी पावसाळापूर्व कामांची तयारी परिणामकारक करण्याची मागणीही त्यांनी केली.

… तर सत्ताधारी, पालिका जबाबदार
पालिकेत शिवसेना सत्तेत असताना भाजपकडून नालेसफाईबाबत वारंवार प्रश्न विचारून घोटाळ्याचे आरोप केले जात होते. मात्र आता केंद्रात, राज्यात आणि पालिकेत सत्ता असताना पहिल्याच पावसात मुंबई तुंबली असताना सत्ताधारी जबाबदारीपासून पळ काढीत असल्याचा आरोपही अनिल परब यांनी केला. त्यामुळे नालेसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील मुंबईत पाणी तुंबत असेल तर सत्ताधारी आणि पालिका जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला. एकीकडे सत्तेत ‘१०० दिवस’ पूर्ण केल्याचे सोहळे साजरे केले जात असताना मुंबईतील पावसापूर्व कामांची स्थिती दयनीय असल्याचेही ते म्हणाले.