
राज्यात गेल्या काही वर्षांपासून अवैध सावकारीच्या घटना वाढत चालल्या आहेत, याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून यासंदर्भातील कायद्यात बदल करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज विधानसभेत केली.
अमरावती येथील अवैध सावकाराच्या प्रश्नावरून आमदार सुलभा खोडके यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात अवैध सावकारीसंदर्भात आतापर्यंत 343 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 266 प्रकरणांमध्ये तथ्य आढळले असून एकूण 34 प्रकरणांमध्ये अवैध सावकारी आढळून आली आहे. या सर्व 34 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून 48 आरोपींची नोंद करण्यात आली असल्याची माहिती बाळासाहेब पाटील यांनी दिली. सावकारी कर्ज रोशन कुळे प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर आलेल्या दिवाकर निकुरे याची याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.
शेतकऱ्यांचे सिबील तपासणार नाही
राज्यातील अनेक बँकांकडून शेतकऱ्यांना कर्जासाठी सिबील स्कोरची विचारणा केली जात असल्याची गंभीर तक्रार शिवसेना आमदार पैलास पाटील यांनी यावेळी केली. यासंदर्भात राज्यातील सर्व बँकांना याबाबत कडक सूचना करण्यात आली असून शेती संदर्भातील कर्जाबाबत सिबील न तपासण्याची सूचना करण्यात आल्याचे सहकार मंत्र्यांनी सांगितले.






























































