
रेल्वे प्रशासनाने धोकादायक ठरविलेल्या मुंबईतील चार पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी) यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी 12 लाख रुपयांचे अॅडव्हान्स पेमेंट करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या पूल विभागामार्फत मुंबईतील विविध उड्डाणपूल, पादचारी पूल, नाल्यावरील पूल आणि भूयारी मार्गांची देखभाल व बांधकामे केली जातात. रेल्वे हद्दीतील पादचारी पुलांच्या बाबतीत महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यात 50-50 टक्के खर्चाच्या तत्त्वावर कामे केली जातात. संबंधित चार पादचारी पूल धोकादायक अवस्थेत असल्याने त्यांचे पुनर्बांधकाम करण्याची गरज असल्याचे रेल्वे प्रशासनाने महापालिकेला कळविले आहे.
या अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांच्या अध्यक्षतेखाली 21 एप्रिल 2026 रोजी झालेल्या बैठकीत या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी मुंबई मार्फत करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार मस्जिद बंदर येथील भंडारी पादचारी पूल, मस्जिद पादचारी पूल तसेच माटुंगा-धारावी परिसरातील दोन पादचारी पूल यांचे परीक्षण करण्यात येणार आहे. बुधवारी होणाऱया स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.
अंतिम अहवाल एकदाच सादर होणार!
महापालिकेच्या म्हणण्यानुसार या कामासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्याऐवजी मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 च्या कलम 72 (3) अंतर्गत निविदा प्रक्रियेत सवलत देण्याची मागणीही स्थायी समितीकडे करण्यात आली आहे. या कामासाठीचा खर्च महापालिकेच्या पूल विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून करण्यात येणार असून, संरचनात्मक लेखापरीक्षणाचा अंतिम अहवाल एकदाच सादर केला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




























































