
जे.जे. रुग्णालयातील कथित रक्तचोरी प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि यामध्ये कुणी दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन आज विधान परिषदेत सार्वजनिक आरोग्य मंत्री मेघना हर्डिकर यांनी दिले. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांची सेवा समाप्तदेखील करण्यात येईल, असे आश्वासन दिले. राज्यातील सर्व रक्तपेढय़ांचे ऑडिट आणि ट्रकिंग प्रणाली लागू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेत भाजप आमदार चित्रा वाघ यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. चिंचपोकळी येथील रक्तदान शिबिरातून संकलित झालेल्या 128 रक्तपिशव्यांपैकी 55 रक्तपिशव्या कोणतीही पूर्वपरवानगी अथवा अधिकृत नोंद न करता बदलापूर येथील ‘माया रक्तपेढी’कडे पाठविण्यात आल्या. हा प्रकार म्हणजे सरकारी रक्ताची थेट चोरी असून सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय, एका खासगी साठवणूक केंद्राला नियमबाह्य सवलत देऊन प्रति रक्तपिशवी 665 रुपयांच्या दराने पुरवठा करण्यात आला, तर त्यातून खासगी संस्थांनी 760 ते 800 रुपयांपर्यंत नफा कमावल्याचा आरोपही करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.




























































