अटल सेतू झाला सुसाईड पॉइंट, अडीच वर्षांत १२ जणांची आत्महत्या.. सरकार विशेष समिती नेमणार; संरक्षक जाळ्या उभारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवडी ते न्हावा शेवा हे अंतर जलदगतीने पार करता यावे यासाठी सरकारने हजारो कोटी रुपये खर्चुन अटल सेतू उभारला आहे, मात्र हा सेतू आता सुसाईड पॉइंट बनत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्या अडीच वर्षांत अटल सेतूवरून आत्महत्या करण्याचा १५ घटना घडल्या असून यात १२ जणांनी जीव गमावला आहे. भविष्यात अटल सेतूवर अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत समिती नेमण्यात येईल. तसेच अटल सेतूच्या काही भागावर जाळी लावण्याचे काम शिल्लक असून या ठिकाणी संरक्षक जाळी लावण्याच्या सूचना तत्काळ संबंधित यंत्रणेला दिल्या जातील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

अटल सेतूवरून समुद्रात उडी मारून पुण्यातील २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. यापूर्वीदेखील अटल सेतूवरून आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यासंदर्भात आमदार उमा खापरे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना उपस्थित करत भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अटल सेतूवर संरक्षक जाळी उभारण्याची मागणी केली होती. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी सांगितले नागरिकांच्या सुरक्षेसाठी अटल सेतूवर गस्ती पथक तैनात असून त्यात तीन बाईक, तीन गाड्या, दोन रुग्णवाहिका, दोन देखभाल पथकांचा समावेश आहे. याशिवाय समुद्रात दोन स्पीड बोटी तैनात आहेत.