अयोध्या राम मंदिर देणगी घोटाळा – रेडिओ मेंटेनन्स ऑफिसरची तत्काळ बदली, 17 वर्षांनंतर CCTV विभागातून गोरखपूरला रवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळ्यावरून राजकारण तापले आहे. या घोटाळ्याप्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या एसआयटीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली. सध्या या प्रकरणाची कसून चौकशी सुरू असून एक महत्त्वाची माहिती मिळत आहे. गेल्या 17 वर्षांपासून कार्यरत असलेल्या रेडिओ मेंटेनन्स ऑफिसर अर्जून देव यांची अखेर बदली करण्यात आली असून गोरखपूरला त्यांची रवानगी केली आहे.

दोन दिवसांपूर्वीच श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी राजीनामा दिला तर, विश्वस्त अनिल मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर आता आरएमओची बदली करण्यात आली. अर्जुन देव यांच्याकडे राम मंदिराची वायरलेस यंत्रणा, सीसीटीव्ही देखरेख आणि देणगी मोजणी कक्षाच्या सुरक्षेची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी होती. दरम्यान, राम मंदिर देणगी घोटाळ्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू असताना अचानक अर्जुन देव यांच्या बदलीमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, 2009 पासून अयोध्येत तैनात असलेल्या अर्जुन देव यांची यापूर्वी अनेकदा बदली झाली होती. मात्र, राजकीय किंवा अंतर्गत दबावामुळे दरवेळी त्यांची बदली रोखली जात होती. राम मंदिर परिसरातील वायरलेस सिस्टीम, सीसीटीव्ही कंट्रोल रूम आणि भाविकांनी अर्पण केलेल्या देणग्यांची मोजणी ज्या खोलीत केली जाते. त्या कौंटिंग रूमच्या देखरेखीची संपूर्ण जबाबदारी अर्जुन देव यांच्यावरच होती.

SIT च्या चौकशीत भूमिकेवर प्रश्नचिन्ह

राम मंदिर देणगी घोटाळ्याप्रकरणाची चौकशी करणाऱ्या ‘एसआयटी’ने (SIT) आपल्या अहवालात अर्जुन देव यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अहवालानुसार, अर्जुन देव हे आपल्या अधिकृत जबाबदाऱ्यांच्या पलीकडे जाऊन राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या अनेक कामांमध्ये सक्रिय असायचे. त्यांचा हस्तक्षेप केवळ सुरक्षा आणि वायरलेस व्यवस्थेपुरता मर्यादित नव्हता तर, व्हीव्हीआयपी (VVIP) दर्शन व्यवस्था आणि मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित अनेक बाबींमध्येही त्यांच्या सहभाग असायचा, असे तपासात समोर आले आहे.