
>>मंगशे वरवडेकर<<
एकीकडे नॉकआऊट सुरू झाले आणि दुसरीकडे पेनल्टी शूटआऊटही सुरू झाले. बाद फेरीच्या पहिल्या दोन दिवसांतील आठ लढतींतच फुटबॉलचा नकाशा उभा राहिलाय. आता फुटबॉलच्या दरबारात वंशपरंपरा नाही, तर दमदार खेळ चालतो. म्हणूनच या दरबारातून जर्मनी-नेदरलॅण्ड्स घसरले अन् मोरोक्को-पॅराग्वे वर चढले.
दशकापूर्वीचा खेळ पाहिला तर राजांच्या सिंहासनाला चार मजबूत पाय असायचे. त्यावर राजा निर्धास्त बसायचा. आजच्या फुटबॉल विश्वातही काही संघांची अशीच अवस्था होती. ब्राझील, जर्मनी, फ्रान्स, नेदरलॅण्ड्स… यांना वाटायचं, विश्वचषक म्हणजे आमच्या वाडवडिलांची जहागीर. बाकीचे संघ म्हणजे दरबारात उभे राहून मुजरा करणारे सरदार समजा किंवा मावळे, पण यंदाच्या वर्ल्ड कपने त्या सिंहासनाचा एक-एक पाय काढून टाकायला सुरुवात केलीय. आता ते सिंहासन डळमळीत झालेय. त्यावर बसणारा राजा घामाघूम होतोय आणि खाली उभे असलेले सैनिक म्हणत आहेत, ‘जरा सरका महाराज… आता आमचीही पाळी.’ जणू हे सिंहासन नसून मुंबई लोकलची चौथी सीटच असावी. चौथा बसला की बाकीच्या तिघांची वाट लागते.
वर्ल्ड कपच्या बाद फेरीतले पहिले आठ सामने तर फुटबॉलच्या लोकशाहीचा जाहीरनामा ठरलेत. इथे नावाला मत नाही. खेळाला मत आहे. फक्त जर्मनीचाच विचार करा. गटसाखळीत त्यांनी इतका रुबाब दाखवला की वाटलं, हा संघ पुन्हा एकदा ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार. त्यांची मांडणी म्हणजे जर्मन इंजिनीअरिंगसारखी अचूक. पासिंगमध्ये पंपास, बचावात काँक्रीट आणि शिस्तीत सैन्य. पण बाद फेरीत पॅराग्वेने त्यांच्या त्या यंत्रणेत असा खिळा टाकला की अख्खं मशीनच अडखळलं. सामना बरोबरीत गेला आणि पेनल्टी शूटआऊटमध्ये जर्मनीचा आत्मविश्वास साबणाच्या फुग्यासारखा फुटला. जर्मन खेळाडूंच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर वाटलं, कुणीतरी मर्सिडीजमध्ये बैलगाडीचं इंजिन बसवलंय. सारी सिस्टीम एका मिनिटात फेल व्हावी, तशी जर्मन सिस्टम फेल गेली.
नेदरलँड्सची गोष्ट तर आणखी मजेशीर. हा तर यंदाचा विजेता म्हणूनच समोर उभा राहत होता. चेंडू त्यांच्या पायात असला की तो कविता लिहितो, असं त्यांचे चाहते समजतात. पण मोरोक्कोने त्यांची कविता थेट प्रश्नपत्रिकेत बदलली. प्रत्येक ओळीला उत्तर मागितलं. प्रत्येक हल्ल्याला प्रतिहल्ला केला. शेवटी पेनल्टीमध्ये संत्र्यांच्या देशाची सालच काढली. नेदरलँड्सचा ‘टोटल फुटबॉल’ मोरोक्कोने ‘टोटल कंट्रोल’मध्ये बदलून टाकला.
मोरोक्कोची ही भरारी काही अपघात नाही. 2022 मध्ये उपांत्य फेरी गाठणारा हा संघ आता कुणालाही घाबरत नाही. कुणालाही भीक घालत नाही. त्यांचा बचाव म्हणजे किल्ला, मध्यफळी म्हणजे सीमाशुल्क आणि गोलरक्षक म्हणजे व्हिसा ऑफिसर. परवानगीशिवाय कुणालाही प्रवेश नाही. युरोपियन संघांना आता मोरोक्को दिसलं की त्यांना सहाराचं वाळवंट आठवत असेल. कारण तिथे पाणी मिळण्यापेक्षा गोल मिळणं कठीण आहे.
पॅराग्वेची कहाणी तर मराठी सिनेमातील शांत नायकासारखी आहे. फार गाजावाजा नाही. मुलाखती नाहीत. जाहिराती नाहीत. पण काम मात्र दमदार. त्यांनी जर्मनीला पेनल्टीपर्यंत खेचलं. तिथे जर्मनीच्या नावाचा दरारा काढून घेतला आणि सांगितलं, ‘भाऊ, वर्ल्ड कपममध्ये पासपोर्टवर शिक्के चालत नाहीत. पायात दम हवा. साखळीत चाचपडणारा पॅराग्वे दरीत कोसळणार असे वाटत होते, पण त्यांच्या पंखांना पॅराशूटने हवेतच उचलले.
आता फुटबॉलचा राजा ब्राझीलकडे वळूया. ब्राझील जिंकला, पण त्यांचा विजय हा पूर्वीसारखा सांबाच्या तालावरचा नव्हता. त्यांची आणि त्यांच्या चाहत्यांची इतकी दमछाक झाली की विजयानंतर जल्लोषासाठी त्यांच्यात त्राणच उरले नव्हते. जपानने त्यांना इतपं छळलं की ब्राझीलच्या चाहत्यांना डॉक्टरकडे जावं लागलं. अखेर अनुभवाने ब्राझीलला वाचवलं. पण त्या सामन्याने एक गोष्ट स्पष्ट केली की, ब्राझील अजून राजा असेल, पण आता त्यांचा मुकुट घट्ट पकडून ठेवावा लागतो. कारण मागे दहा हात तो खेचायला तयार आहेत.
दुसरीकडे फ्रान्सने स्वीडनला हरवत आपली ताकद दाखवली, पण त्यांच्यासमोर आता पॅराग्वे आहे. म्हणजे शाळेतल्या पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला आता अभ्यासापेक्षा कॉपी न करणाऱ्या विद्यार्थ्याची भीती वाटू लागलीय. कारण हा वर्ल्ड कप नावाला नाही, तर मेहनतीला गुण देतोय.
मेक्सिकोने घरच्या प्रेक्षकांच्या जोरावर इक्वाडोरला बाहेरचा रस्ता दाखवला. कॅनडाने दक्षिण आफ्रिकेला हरवलं. नॉर्वेने आयव्हरी कोस्टला नमवलं. ही नावं कदाचित ट्रॉफीची पारंपरिक दावेदार नसतील, पण त्यांनी मोठय़ा संघांना एक संदेश दिलाय की, तुमचा इतिहास आम्ही वाचलाय. आता आमचं वर्तमान तुम्ही वाचा. या वर्ल्ड कपने आणखी एक बदल घडवला आहे. पूर्वी सुपरस्टार संघ जिंकायचे. आता सुपर संघ जिंकतात. एका खेळाडूच्या जादूवर अवलंबून राहणारे संघ अडखळतात. फुटबॉलने क्रिकेटसारखी ‘वन मॅन शो’ संस्कृती कधीच स्वीकारली नव्हती. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, सिंहासनाला आता चार पाय राहिले नाहीत. एक पाय मोरोक्कोने कापला, दुसरा पॅराग्वेने, तिसरा नॉर्वेने आणि चौथा जपानने हलवून ठेवला. अजून काही राजे सिंहासनावर बसले आहेत, पण आता त्यांची बसण्याची पद्धत बदलली आहे. आजच्या फुटबॉलमध्ये इतिहासाला सलाम केला जातो, पण भविष्यासाठी लाल गालिचा कुणाच्याही नावावर राखून ठेवला जात नाही. वर्ल्ड कप हा राजेशाहीचा नाही, तर लोकशाहीचा उत्सव आहे. या लोकशाहीत प्रत्येक चार वर्षांनी मतपेटी उघडते… मतदार असतो चेंडू… आणि मतमोजणी झाल्यावर अनेकदा राजा बदललेला असतो. यावेळी राजा बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढील दोन आठवडय़ात फुटबॉलला नवा राजा लाभला तर कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. हीच तर या खेळाची खरी गंमत आहे.



























































