
हॉटेल, बेकरी आणि पनीर विक्रेत्यांनंतर अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा राज्यातील ‘दूध सम्राटांकडे’ वळवला आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील वाढती भेसळ आणि ग्राहकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवण्यासाठी राज्यात ‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग’ ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भेसळखोरांवर एफडीएची करडी नजर राहणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.
शुद्ध, सकस व भेसळमुक्त दूध मिळणे हा ग्राहकांचा अधिकार आहे. यासाठी दुधातील भेसळ आणि कृत्रिम दुधाचा सुळसुळाट रोखण्यासाठी संपूर्ण ‘इकोसिस्टम’ बदलणे गरजेचे असून दूध संकलनापासून ते थेट ग्राहकांच्या ताटात जाईपर्यंतच्या संपूर्ण पुरवठा साखळीसाठी कडक नियमावली जाहीर करण्यात येत असल्याचे तुकाराम मुंढे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दूध उत्पादक, दूध गोळा करणाऱ्यांपासून ते कोल्ड चेनपर्यंत, प्रक्रिया करण्यापासून ते वाहतुकीद्वारे विक्रेत्यांपर्यंत दूध पोहोचवण्याकरिता जे जे लोक कार्यरत आहेत त्या सर्वांना 2011 सालचे परवान्याचे किंवा नोंदणीचे मानक लागू आहेत. अन्न उत्पादन मानके व अन्न संयोजके याचेही नियम लागू आहेत. त्याचबरोबर दूषके, अवशेष याचेही 2011चे नियम लागू आहेत. विक्रीवरील प्रतिबंध आणि निर्बंध, लेबलिंग आणि प्रदर्शन, अन्न सुरक्षा पॅकेजिंग तसेच जाहिरात आणि दावे याचेही नियम लागू असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
…अन्यथा थेट परवाना रद्द
हॉटेल तपासणी दरम्यान अनेकांनी पेस्ट पंट्रोल केल्याची खोटी प्रमाणपत्रे दाखवली होती, मात्र प्रत्यक्षात तिथे कोणतेही काम झाले नव्हते. मला केवळ कागदावरचे नियम आणि प्रमाणपत्रे नको आहेत. जर दुग्ध व्यवसायाच्या ठिकाणी प्रत्यक्ष नियमांचे पालन झाले नाही, तर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट व्यावसायिक परवाना रद्द केला जाईल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
नियम कुणाला लागू?
– दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण पेंद्र, दुग्ध प्रक्रिया युनिट्स व उत्पादक, पॅकर्स आणि फिलिंग स्टेशन, वितरक, वाहतूकदार, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच सुटे दूध विक्रेते.
– दुग्धजन्य पदार्थांचे विक्रेते, त्याचे पॅकिंग करणारे यांनाही नियम लागू असणार आहेत. पनीर, खवा, तूप, लोणी, क्रीम, दही, आईस्क्रिम, चीज, दूध पावडर, फ्लोअर मिल आणि इतर दुग्धजन्य पदार्थ व त्याचे उत्पादक.
मुख्याध्यापकांनी माहिती द्यावी
शाळांच्या 500 मीटर परिसरात कुठल्या पदार्थांना, शीतपेयांना विक्रीचे नियम आहेत. या नियमांची अंलबजावणी करण्याची जबाबदारी एफडीए आयुक्त म्हणून माझी आहे. तसेच दुसरीकडे शाळेतील मुख्याध्यापकांचीही आहे. त्यामुळे शाळा परिसरात 500 मीटरच्या आत जर अशा प्रकारचे एनर्जी ड्रिंक्स विकले जात असतील तर आमच्या विभागाला कळवावे, असे आवाहन मुंढे यांनी केले.
दूध तपासणीत आढळलेल्या त्रुटी
दुधामध्ये पाण्याची भेसळ करणे.
रसायनांच्या वापराने कृत्रिम दूध तयार करणे.
दुधात युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, स्टार्च, ग्लुकोज आणि मेलामाईनचा वापर.
मिल्क फॅट व एसएनएफ मानकांचे उल्लंघन.
उत्पादनांवर चुकीचे लेबलिंग करून ग्राहकांची दिशाभूल करणे.






























































