
महिलांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी सुरू केलेल्या ‘पिंक ई-रिक्षा’ योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात किमान 5 हजार महिलांना याचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असून, लाभार्थ्यांना वारंवार आरटीओ कार्यालयात जावे लागू नये यासाठी स्वतंत्र बैठका घेऊन आवश्यक सुधारणा करण्यात येतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. 2024 मध्ये आठ जिह्यांतील प्रमुख शहरांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत 130 गुलाबी ई-रिक्षांचे वितरण केले आहे. या योजनेत ई-रिक्षाच्या खर्चापैकी 20 टक्के अनुदान शासनाकडून, 70 टक्के बँक कर्ज आणि 10 टक्के लाभार्थीचा सहभाग असल्याचेही त्यांनी नमूद केले.




























































