
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी ९ जुलैच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढवणारी एक घटना समोर आली आहे. मेलबर्न येथे हिंदुस्थानी समुदायासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेलबर्न मीट्स मोदी या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या गंभीर प्रकारानंतर ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली असून, धमकी देणाऱ्या संशयित पोस्टचा आयपी ॲड्रेस शोधण्यात यंत्रणांना यश आले आहे.
मेलबर्नमधील मार्वल स्टेडियमवर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, हा कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातील मुख्य आकर्षण मानला जात आहे. ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, फेसबुकवर या कार्यक्रमाची माहिती देणाऱ्या एका प्रचारात्मक पोस्टखाली अबू मुस्तफा नावाच्या अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली. “कार्यक्रमादरम्यान स्टेडियमचे छत बंद ठेवले तर बरे होईल, अन्यथा ते आपल्या मृत्यूसाठीच ऑस्ट्रेलियात येत आहेत,” अशी गंभीर धमकी या अकाऊंटवरून देण्यात आली. ही पोस्ट निदर्शनास येताच हे प्रकरण तत्काळ ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांकडे तपासासाठी सोपवण्यात आले.
सध्या तपास यंत्रणांकडून या आयपी ॲड्रेसची पडताळणी सुरू असून, ही धमकी कुणी आणि नेमक्या कोणत्या हेतूने दिली याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात कोणत्या गुन्हेगारी कायद्याचे उल्लंघन झाले आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांनी अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नसले तरी, परदेशी राष्ट्रप्रमुखांच्या सुरक्षेबाबत अशा धमक्या अत्यंत गांभीर्याने घेतल्या जातात.



























































