
भारतीय जनता पक्षाच्या विकास मॉडेलचा आणि रामनगरी अयोध्येतील सुशासनाचा बुरखा शुक्रवारी अक्षरशः फाटला. ज्या अयोध्या विकास प्राधिकरणावर (ADA) संपूर्ण शहराच्या बांधकामाचा दर्जा आणि नियम राखण्याची जबाबदारी आहे, त्याच प्राधिकरणाच्या कार्यालयाच्या पायऱ्या पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. विशेष म्हणजे, भाजपचे आमदार आणि महापौरांच्या उपस्थितीतच सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा हा नमुना उघडकीस आला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भाजप सरकारच्या पोकळ दाव्यांची आणि निकृष्ट बांधकामांची पोलखोल या घटनेने केली आहे.
विकासाच्या दाव्यांचा उडाला फज्जा
प्राधिकरणाच्या कार्यालयात कोचिंग आणि लायब्ररी चालकांसोबत एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भाजपचे स्थानिक आमदार वेद प्रकाश गुप्ता आणि महापौर महंत गिरीशपती त्रिपाठी उपस्थित होते. मात्र बैठक संपताच अधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या डोळ्यादेखत कार्यालयाच्या पायऱ्या अचानक खाली कोसळल्या. यावेळी मोठी गर्दी असल्याने एकच गोंधळ उडाला आणि आमदार-महापौरांसह सर्वांनाच जीव मुठीत धरून सुरक्षित स्थळी पळ काढावा लागला.
या घटनेने प्रशासनातील भ्रष्टाचारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. संपूर्ण अयोध्येत कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असल्याचा डांगोरा सरकारकडून पिटला जात असताना, गुणवत्ता तपासणाऱ्या प्राधिकरणाची स्वतःचीच इमारत किती तकलादू आहे, हे यातून स्पष्ट झाले. जे अधिकारी स्वतःच्या कार्यालयाची सुरक्षा सुनिश्चित करू शकत नाहीत, ते सामान्य जनतेच्या आणि शहरातील इतर इमारतींच्या सुरक्षिततेची हमी काय देणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.



























































