
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील देणगी लुटीच्या निषेधार्थ हिंदू जागृतीसाठी आज मुंबईत भरपावसात ठिणगी पेटली. रामभक्तांच्या विराट समुदायाच्या उपस्थितीत दादरच्या मारुती मंदिरासमोरून शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनाचा शंखनाद घुमला. राम मंदिराच्या चोरांना तडीपार केल्याशिवाय स्वस्थ बसू नका, अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजारो हिंदूंच्या साक्षीने केली. आता जाग आलीय ती जाऊ देऊ नका, झोपू नका… जागे रहा, असे आवाहन देशातील तमाम हिंदू आणि रामभक्तांना करतानाच, या चोरीचा निःपक्षपातीपणे निकाल लावला जात नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.
अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरासाठी देणगी स्वरूपात आलेले पैसे आणि मौल्यवान वस्तू असा कोटय़वधी रुपयांचा ऐवज चोरला गेला त्याविरोधात शिवसेनेने आजपासून रामरक्षा आंदोलन हाती घेतले. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दादरच्या कबुतरखान्याजवळील मारुती मंदिरात रामरक्षा, मारुती स्तोत्र आणि हनुमान चालिसा पठण केले गेले. यावेळी हजारो हिंदू बांधव, शिवसैनिक आणि रामभक्त नागरिक उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… या वाक्याने त्यांनी सुरुवात करताच जय श्रीराम… हर हर महादेव… छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या एका वाक्याने देशातल्या तमाम हिंदूंना जागे केले होते आणि विखुरलेल्या हिंदूंना एकवटले होते, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली. आपण कट्टर कडवट देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळे आहोत, भाबडे आहोत, पण मूर्ख नाही. या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन कुणी राम मंदिर लुटत असेल तर हिंदू माफ नाही करणार, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. शिवसेनेने हिंदुत्व सोडले म्हणता मग बघा, हा तमाम हिंदू एकवटलाय, तुम्ही कुठे आहात, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.
देशात नको ती लोपं सत्ता भोगताहेत
हिंदू भयग्रस्त होता, आधार शोधत होता तेव्हा शिवसेनेचा भगवा शिवसेनाप्रमुखांनी हिंदूंच्या हाती दिला. पण त्याचा गैरफायदा घेतला गेला. आज नको ती लोकं सत्ता भोगताहेत आणि हिंदू आजही भरडला जातोय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. आज 12 वर्षे होऊन गेली, ज्यासाठी आपण मेहनत केली होती ती व्यक्ती पंतप्रधानपदी बसली आणि बसल्यानंतर कट्टर, कडवट शिवसेनेला नष्ट करण्यासाठी जणूकाही त्यांनी अफझलखानी विडा उचलला आहे. कारण देशात फक्त शिवसैनिक आणि शिवसेनाच त्यांना समोर उभी राहून निधडय़ा छातीने सवाल विचारू शकते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हिंदूंना लुटणारे सरकार केंद्रात बसलेय
भगव्याचे सरकार देशात आले तेव्हा हक्काचे सरकार आले असे शिवसेनेला वाटले होते. अटलबिहारी वाजपेयीजी म्हणाले होते, अब हिंदू मार नही खायेगा, पण हिंदूंना लुटणारे सरकार आज केंद्रात बसले आहे हे दुर्भाग्य आहे, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
राम मंदिरातील चोरी पाहिली की शिसारी येते
राम मंदिरातून चोरलेले पैसे शौचालयात लपवले जात होते. त्या चोरीच्या बातम्या पाहिल्या तर शिसारी येते, असा संताप व्यक्त करत उद्धव ठाकरे म्हणाले की, अयोध्येतील आयएएस अधिकारी जे पूर्वी गृह सचिव होते त्यांनी आईचे दागिने वितळवले आणि जवळपास एक किलो सोन्याचा मुलामा दिलेले रामचरीत मानस राम मंदिराला दान केले होते तेसुद्धा अयोध्येतून गायब झाले. शिवसेनेने एक कोटी रुपयांची देणगी आणि चांदीची वीट दिली होती. सिंधी समाजाने चांदीच्या विटा दिल्या होत्या. कुठे गेले हे सगळे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
लाज वाटली पाहिजे हिंदू म्हणवून घेण्याची
अयोध्येत चोर लोक बसले आहेत, आम्ही मंदिरात जातो तेव्हा आमची लंगोटीही चेक केली जाते असा आरोप साधूसंत करत आहेत. साधूसंतांशी असे वागताय आणि करोडो रुपयांचा माल गपापा करताय? असा जाब उद्धव ठाकरे यांनी विचारला. कष्टकरी, साधाभोळा हिंदू श्रद्धेने अयोध्येत जातो, नवस बोलतो आणि फूल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्या कमाईतले एक-दोन रुपये दानपेटीत टाकतो तेसुद्धा गायब केले जातात. लाज वाटली पाहिजे हिंदू म्हणून घेण्याची, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
रामरक्षा करण्यासाठी शिवसेनेसोबत रस्त्यावर या
तथाकथित हिंदू आणि भोंदूरक्षक आहेत ते शिवसेनेवर टीका करतात. जर तुमच्या धमन्यांमध्ये हिंदूंचे रक्त असेल तर रामरक्षा करण्यासाठी शिवसेनेसोबत रस्त्यावर या. रामाची रक्षा करायची आहे. शिवसेनेला भाजपमुक्त राम हवा आहे. राम सर्वांचा आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरात सत्याग्रह केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हा राम सर्वांचा आहे, सर्व हिंदू समाजाचा आहे. देशातील सर्व नागरिकांचा आहे. म्हणून त्या भोंदू हिंदुत्वरक्षकांना सांगतोय. आचार्य वगैरे उपाध्या लावताय, स्वतःच उपाध्या लावल्या म्हणून कुणी आचार्य बनत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा सागरगोटा असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी यावेळी समाचार घेतला. एक सागरगोटा अयोध्येत बसला आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. एवबोलून तो थांबला नाही. जसे ईडी वगैरे छापे टाकतेय तसे शिवाजी महाराज पैसा लागायचा तेव्हा सुरतेवर छापे टाकायचे. हा सागरगोटा आम्हाला शिवचरित्र शिकवतो, अशी चपराक उद्धव ठाकरे यांनी लगावली.
निःपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे
या सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि निःपक्षपातीपणे झाली पाहिजे. नाहीतर चोराला सांगितले की तुझ्या चोराचा तपास तूच लाव तर चार दिवसांत निकाल येईल आणि सर्वांना क्लीन चिट देऊन सगळय़ांना मोकळे सोडले जाईल, अशी शक्यताही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
राम मंदिरासाठी शिवसैनिकांइतके काम कुणीच केले नाही
राम मंदिराच्या नावावर अमर्याद सत्ता भोगणाऱया भारतीय जनता पक्षावर यावेळी उद्धव ठाकरे यांचे आसूड कडाडले. ते म्हणाले की, देशाची सत्ता घेताना भाजपने जय श्रीराम, मंदिर वही बनायेंगेच्या घोषणा दिल्या, पण त्या आंदोलनात शिवसैनिकांनी जेवकाम केले तेवकोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले नाही. शिवसैनिक रथयात्रेत सहभागी झाले. अयोध्येत जाऊन कारसेवा केली. मंदिरासाठी झालेल्या शिळा पूजनालाही होते. अनेक कारसेवकांनी राम मंदिरासाठी रक्त सांडले होते. अनेकांचे जीव गेले. त्यानंतर मुंबईने जे भोगले ते क्वचित एखाद्या शहाराने भोगले असेल. मुंबईत बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या. त्यावेळी फक्त हिंदूंच्या मागे एकच मर्द उभा राहिला होता ते म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, असे उद्धव ठाकरे म्हणताच शिवसेनाप्रमुखांचा प्रचंड जयघोष झाला.
चौकीदार चोर है !
भाजप सरकार हिंदूंना लुटणारे सरकार आहे असा आरोप आपण नव्हे तर अनेकजण करत आहेत. त्याची पहिली सुरुवात शंकराचार्यांनी दोन वर्षांपूर्वी केली. केदारनाथचं कित्येक किलो सोनं लुटलं गेलं, असे शंकराचार्य म्हणाले. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप होताहेत. उज्जैनच्या इथल्या सगळ्या जमिनी त्यांनी या. महाकालसाठी काळ ठरलेत हे आणि आता अयोध्येतल्या तर अशा बातम्या येताहेत ते सगळं ऐकून शिसारी येते या लोकांची, असे उद्धव ठाकरे म्हणताच ‘चौकीदार चोर है’ अशा घोषणा गर्दीतून घुमल्या.
अयोध्या तो झांकी है. काशी-मथुरा बाकी है, असे बोलत होते. आता मला भीती वाटायला लागलीय. जर अयोध्येची ही अशी झाकी असेल तर काशी-मथुरा किती लुटतील.
अब हिंदू माफ नही करेगा. झालं तेवढं खूप झालं. तुमची मोहिनीविद्या आता आमच्यावरती चालणार नाही. असं म्हणतात, प्रभू श्रीरामांचा जप केल्यानंतर भूतही पळून जातं. मग त्यापुढे हे कोण आहेत. यांना पळवायला किती वेळ लागेल!
तमाम हिंदूंना माझे सांगणे आहे, तुम्ही चोररक्षा करण्यासाठी रस्त्यावर येऊ नका, आमच्यासोबत रामरक्षा करण्यासाठी रस्त्यावरती या. जे आमच्यावरती आरोप करतील त्यांना चोररक्षकच म्हटले पाहिजे.
गावागावांत, खेड्यापाड्यात, भरचौकात रामरक्षा घुमू दे
मुंबईतून टाकलेली ठिणगी महाराष्ट्रात, गावागावात, खेड्यापाड्यात दिसली पाहिजे, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी तमाम हिंदूंना केले. जिथे जिथे राम मंदिर, हनुमान मंदिर आहे तिथे रामरक्षा, हनुमान चालिसा घुमू दे. मंदिर नसेल तर भरचौकात श्रीरामाची, हनुमानाची प्रतिमा लावून तिथे रामरक्षा पठण करा. कारण महाराष्ट्र पुढे सरकतो तेव्हा देश त्याच्या मागे जातो. आज महाराष्ट्र देशाला वाचवण्यासाठी आणि हिंदुत्वाचे, रामाचे रक्षण करण्यासाठी चाललाय. चला आपण चोरांना तडीपार करूया.
जेव्हा हिंदू भीतीग्रस्त होता आणि मी हिंदू आहे हे बोलण्याचीही त्याला हिंमत होत नव्हती, तेव्हा शिवसेनाप्रमुख गरजले होते, गर्व से कहो हम हिंदू है. ते हिंदुत्व शिवसेनेला पुन्हा जागे करायचेय. तो नारा पुन्हा बुलंद करा.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रामरक्षा, हनुमान चालिसा, मारुती स्तोत्र याचे रविवारी सामूहिक पठण झाले. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, उपनेत्या ज्योती ठाकरे उपस्थित होत्या.
पावसात भिजूनही रामरक्षा, मारुती स्तोत्र, हनुमान चालिसा म्हणणारा हिंदू काही वेडा नाही. ही पावसात पेटलेली ठिणगी आहे. रामभक्त कसे आहेत ते राज्यकर्त्यांना कळले नसतील तर प्रभू श्रीरामाबरोबर जी वानरसेना होती त्यांनी रावणाची लंका जाळून खाक केली होती हे लक्षात ठेवा. तुम्ही शिवसेना पक्ष चोरला. आमच्याकडचा प्रभू रामचंद्रांचा धनुष्यबाण चोरला. पण आज शिवसैनिकांच्या हाती हनुमानाने लंका जाळली होती ती मशाल आहे. ही मशाल तुमच्या अन्यायाची लंका जाळून खाक करेल.
देशातील तमाम हिंदूंना विनंती करतोय, जागे राहा जागे राहा जागे राहा… शिवसेनाप्रमुखांनी हिंदूंना जाग आणली होती. आज हिंदूंना संमोहित केले जातेय. या संमोहनातून बाहेर या. तुमचा गैरफायदा घेतला जातोय. भोळेपणा सोडून द्या. तुम्ही कट्टर कडवट रामभक्त आणि शिवभक्त आहात. जय शिवराय, जय सियाराम म्हणा आणि जे राम मंदिराची तिजोरी चोरताहेत त्यांना जाब विचारा. त्यांना ठणकावून सांगा, चोरांना रामाचे नाव घेण्याचा अधिकार नाही. अजिबात नाही.



























































