
जोरदार वारा आणि पावसामुळे पडझडीच्या गंभीर घटना घडत असून आज मानखुर्दमध्ये चाळ कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांना मृत्यू झाला. यामध्ये चार महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे तर पाच जण जखमी आहेत. यातच सकाळी कुर्ला येथे अंगावर झाड कोसळून 63 वर्षीय युनूस कुंडावाला यांचा मृत्यू झाला तर आरे कॉलनी येथे बाईकवर झाडाची फांदी पडून झालेल्या दुर्घटनेत 18 वर्षांच्या हसन रझा या तरुणाचा मृत्यू झाला. पालिकेच्या निष्काळजीपणामुळे आठवडाभरात झाडे कोसळून तीन जणांचे बळी गेले आहेत.
मानखुर्द येथील जनता नगर येथील हनुमान मंदिरामागे असलेल्या चाळ क्रमांक 5 मधील दोन ते तीन घरांचा भाग रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, मुंबई महानगरपालिकेचे एम/पूर्व विभागाचे कर्मचारी तसेच 108 रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकाने युद्धपातळीवर शोध आणि बचाव मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, जखमींना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता पाच जणांचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले, तर राजावाडी रुग्णालयात दाखल केलेल्या एका मुलाचाही मृत्यू झाला.
आठवडाभरात 3 बळी
30 जून रोजी चेंबूर भागात शाळेच्या बसवर भलेमोठे झाड कोसळले. या दुर्घटनेत चार मुले गंभीर जखमी झाली, तर एका 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणावरून वातावरण तापल्यानंतर महापालिका प्रशासनाने तीन अधिकाऱयांचे निलंबन केले. तसेच चौकशी समिती गठीत केली. ही घटना ताजी असताना रविवारी सकाळी कुर्ला कमानी येथील गोम्स टाऊन इमारतीजवळ असणाऱ्या दुकानावर झाड पडले. यामध्ये युनूस कुंडावाला (63) हे गंभीर जखमी पडले. त्यांना फौजिया रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. झाड कोसळल्यानंतर महापालिकेकडून कोणी मदतीला आले नाही, अशी तक्रार स्थानिकांनी केली. दुसरी घटना दुसरी घटना शनिवारी दुपारी अडीच वाजता गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीतील युनिट क्रमांक 13 परिसरात घडली. हसन रझा जहांगीर आलम सय्यद (18) हा मित्रांसोबत दुचाकीवरून जात असताना मुसळधार पावसात झाडाची फांदी तुटून त्याच्या डोक्यावर पडली. गंभीर जखमी कुमारला मालाड येथील बालाजी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
भरपावसात आंदोलन
कुर्ला दुर्घटनेला दोन तास उलटल्यानंतर घटनास्थळी महापालिकेचे अधिकारी आले नाहीत म्हणून स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. नागरिकांनी महापालिकेविरोधात आंदोलन केले. मनसे नेते महेंद्र भानुशाली यांनी डोक्याला काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन केले. महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ठिय्या आंदोलनात भाग घेतला. रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे करणाऱया अधिकाऱयांवर आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली.
पाच लाखांची आर्थिक मदत
कुर्ला येथील दुर्घटनेतील मृत युनूस कुंडावाला यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन कुर्ला आणि परिसरातील झाडांचे ऑडिट करण्याचे आणि आवश्यक तिथे वृक्ष छाटणी करण्याचे निर्देश दिले.
मुंबई, ठाणे, पालघर रायगडात आज शाळांना सुट्टी
हवामान विभागाने उद्या सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथे सोसाटय़ाच्या वाऱयासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर चारही जिह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



























































