
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर सातत्याने मराठी भाषिकांच्या पाठीशी असल्याची भूमिका शिंदे गटाकडून मांडली जात आहे. कर्नाटकात मात्र, मराठी भाषिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे सोडून पक्षविस्तारासाठी शिंदे गटाकडून कन्नड भाषेचा पुरस्कार केला असल्याचे दिसून येत आहे. या दुटप्पी राजकारणामुळे सीमाभागातील मराठी जनतेकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
सीमाभागात अनेक दशकांपासून महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिक संघटना मराठी भाषा, संस्कृती आणि सीमाप्रश्नांसाठी संघर्ष करत आहेत. त्याला बळ देण्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे गटाकडून कर्नाटकात कन्नड संवर्धनाची भूमिका घेतली जात असल्याने मराठी भाषिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदे गटाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी येथील मराठी जनतेकडून होत आहे.
कन्नड शिकविण्यासाठी १०० स्वयंसेवक
शिंदे गटाच्या कर्नाटक पक्ष कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत कन्नड भाषेचे जतन आणि संवर्धनासाठी विशेष मोहीम राबविणे, कन्नडेतर उद्योग-व्यवसायांमध्ये काम करणाऱ्यांना कन्नड शिकविण्यासाठी १०० स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याबरोबरच कन्नड भाषेचा प्रचार-प्रसार वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा करण्यात आली.



























































