
डोळखांब परिसरातील गुंडे गावात रात्रीच्या सुमारास बिबट्या मुक्त संचार करत असल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सध्या शेती हंगाम सुरू असूनही गावकरी आपल्या गुराढोरांसह शेतावर जाण्यास घाबरत आहेत. सायंकाळी सहानंतर तर बिबट्याच्या भीतीने संपूर्ण गावात अघोषित कर्फ्यूच असतो. त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर सापळा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
डोळखांब वनपरिक्षेत्र हद्दीत आजोबा पर्वत व चोंढे घाटघर या दुर्गम भागात घनदाट जंगल असून अजूनही वाघ, बिबट्या, तरस, लांडगे, कोल्हे, रानडुकरे, रानकुत्री अशी हिंस्र श्वापदे आढळतात. कधी कधी वाघ आणि बिबट्या यांना जंगलात शिकार न मिळाल्यास ते शेजारच्या मानवी वस्तीत येऊन अनेकदा पशुधनावर हल्ला करतात. वर्षातून अशा काही घटना घडतच असतात. दरम्यान आजोबा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गुंडे गावातील राजू यशवंतराव यांच्या घरासमोरील अंगणातून मध्यरात्री बिबट्या गेल्याचे दृश्य घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
घराबाहेर पडायचे कसे?
याबाबत वनविभागाला कळवल्यानंतर डोळखांब वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश पाटील यांनी कार्यालयातील कर्मचारी पाठवून आढावा घेण्यात असल्याचे सांगितले. मात्र वनविभागाचे पथक येऊन पिंजरा लावणार कधी आणि आम्ही कामासाठी घराबाहेर पडणार कधी, असा सवाल केला आहे.


























































