
विवाह म्हटले की मंगलाष्टके, वधू-वरांवर अक्षतांचा वर्षाव आणि शुभाशीर्वाद हे चित्र प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र, यवतमाळ येथील प्रसाद व भैरवी नायगावकर यांनी आपल्या कन्या आसावरीच्या विवाह सोहळ्यात परंपरेचा सन्मान राखत एक विधायक बदल घडवून आणला. तांदळाचा अपव्यय आणि अन्नाचा अनादर टाळण्यासाठी विवाहात उपस्थितांना अक्षता न देता, सर्वांच्या वतीने केवळ पुरोहित आणि वधू-वरांचे आई-वडील यांनीच नवदांपत्यावर अक्षतावर्षाव केला. या उपक्रमाचे उपस्थितांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
८ जुलै रोजी आसावरी नायगावकर हिचा विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंगलाष्टके सुरू झाली, मात्र उपस्थितांच्या हातात अक्षता देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे सुरुवातीला अनेकांना आश्चर्य वाटले. लग्नाच्या गडबडीत अक्षता द्यायच्या राहून गेल्या असाव्यात, असा समज काहींनी करून घेतला. मात्र, यामागे जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असल्याचे स्पष्ट होताच उपस्थितांनी या बदलाचे मनापासून स्वागत केले.
सर्वांनी अक्षता उधळल्यास त्या जमिनीवर पडून पायाखाली तुडवल्या जातात आणि शेवटी कचऱ्यात जातात. अन्नाचा अपमान होऊ नये, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून सर्वांच्या वतीने केवळ पुरोहित तसेच वधू-वरांचे आई-वडील अक्षतावर्षाव केला . त्यानंतर उपस्थितांनी हात जोडून, टाळ्यांच्या गजरात नवदांपत्याला शुभाशीर्वाद दिले.
भारतीय संस्कृतीत धान्याला अत्यंत पवित्र स्थान आहे. वेदांमध्ये “अन्नं ब्रह्म” असे म्हटले आहे. तांदळाचा प्रत्येक दाणा हा शेतकऱ्याच्या घामाचे, निसर्गाच्या कृपेचे आणि ईश्वराच्या आशीर्वादाचे प्रतीक मानला जातो. अक्षता म्हणजे अखंड, न तुटलेले तांदूळ. त्या समृद्धी, सौभाग्य, ऐश्वर्य आणि अखंड मंगलतेचे प्रतीक आहेत. विवाहात नवदांपत्याच्या सुखी आणि समृद्ध सहजीवनासाठी अक्षतावर्षाव करण्याची परंपरा आहे; मात्र त्याच अक्षता पायाखाली तुडवल्या जाणे ही खेदाची बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
अलीकडच्या काळात काही विवाह सोहळ्यांमध्ये अन्नाचा अपव्यय टाळण्यासाठी अशा प्रकारचे सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. परंपरेचा गाभा कायम ठेवत सामाजिक जबाबदारीची जाणीव जपणारे हे उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
नायगावकर कुटुंबाच्या या उपक्रमातून एक महत्त्वाचा संदेश समाजापुढे आला—परंपरा जपूया, पण अन्नाचाही सन्मान करूया. शुभाशीर्वाद मनापासून दिले तर त्यासाठी तांदळाचा अपव्यय आवश्यक नाही. अन्नाचा आदर हीच खरी भारतीय संस्कृती आहे.






























































