
ठाणे महापालिकेच्या दिवा येथील आरोग्य केंद्रांमध्ये आणि आशा वर्कर्सकडे लहान मुलांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ‘विटामिन ए’ या औषधाचा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तीव्र तुटवडा जाणवत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील लहान मुलांमधील कुपोषण, अंधत्व रोखण्यासाठी आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ठरावीक अंतराने ‘विटामिन ए’चे डोस देणे बंधनकारक आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हा पुरवठा खंडित झाल्यामुळे दिव्यातील शेकडो गरीब व गरजू कुटुंबांतील लहान मुले या आवश्यक डोसपासून वंचित आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या नियमांनुसार बालकांमधील अंधत्व निवारणासाठी ‘विटामिन ए’चा डोस वेळेवर मिळणे हा त्यांचा आरोग्यविषयक हक्क आहे, तसेच माता व बाल संगोपन औषधांचा साठा अखंडित ठेवणे पालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. दिव्यातील गरीब जनता पूर्णपणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर अवलंबून असताना औषधांचा हा तुटवडा म्हणजे बालकांच्या आरोग्याशी खेळ आहे. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ठाणे पालिकेचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
प्रशासनाने सात दिवसांच्या आत सकारात्मक पावले उचलून औषधांचा पुरवठा सुरळीत केला नाही तर स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि बालकांच्या हक्कासाठी प्रशासनाविरोधात आंदोलन केले जाईल. – सचिन पाटील, शिवसेना शहरप्रमुख, दिवा
सात दिवसांत औषधे द्या !
दिवा प्रभाग समितीअंतर्गत सर्व आरोग्य केंद्रे आणि आशा वर्कर्सना ‘विटामिन ए’चा पुरेसा साठा पुढील ७ दिवसांच्या आत तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच गेल्या तीन-चार महिन्यांपासून हा औषध पुरवठा का खंडित झाला, याची सखोल चौकशी करून संबंधित दोषी विभागावर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांनी ठाणे पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे





























































