
>> डॉ. मीनाक्षी पाटील
[email protected]
नाटक ही आशयप्रधान कला असली तरी तिच्या प्रयोगरूपाला विशेष महत्त्व असते. नाटककाराने लिहिलेले संवाद व दिलेल्या रंगसूचनांतून दिग्दर्शक व इतर घटकांच्या मदतीने उभा राहणारा नाटय़ावकाश व कालावकाश यातून नाटकाचा एक समग्र सौंदर्यानुभव सिद्ध होत असतो. ही दृकश्राव्य प्रतिचित्रणात्मक प्रयोगकला असून ती कालावकाशविशिष्ट असते. नाटय़ प्रयोगाच्या वेळी प्रेक्षक दोन काळांचा व दोन अवकाशांचा अनुभव घेत असतो.
आपण गेल्या लेखात नाटक आणि साहित्य यातील अनुबंध समजून घेण्याचा प्रयत्न केला. नाटकाचा एक कला म्हणून ज्यावेळी विचार केला जातो त्यावेळी खरे तर कोणत्या ना कोणत्या रूपात प्रयोग कल्पनेचाही विचार केलाच जातो. नाटककार नाटक लिहितो म्हणजे एक संहिता तयार करतो. त्यामध्ये तो नटांसाठी संवाद लिहितो, ज्यातून पात्रांचे स्वभाव , घटना-प्रसंग, कथानक आकारते. नाटककाराने लिहिलेल्या नाटय़ संहितेतील संवादांसोबतच दिलेल्या रंगसूचनांच्या माध्यमांतून अनेक अदृश्य जागा नाटय़ दिग्दर्शकाला दिसत असतात.अशा प्रकारे दिग्दर्शक नाटय़ संहितेचं अर्थनिर्णयन करता करताच समांतररीत्या प्रयोगाचं रूपनिर्णयनदेखील करतो. नाटय़ संहितेतील आशयाच्या अंगाने व रंगसूचनांच्या अंगाने येणारी अनेकार्थता समजून घेऊन प्रयोगाची आखणी करतो. अशा रीतीने नाटककाराने लिहिलेल्या शब्दांतून दिग्दर्शकाच्या मानसपटलावर उभं राहणारं नाटक तो प्रत्यक्ष प्रयोगरूपात आणत असतो.
नाटककाराची भाषा रंगभूमीच्या भाषेत रूपांतरित होते. लिखित शब्द रंगमंचावर नटांच्या माध्यमातून नाटय़गत शब्द होतात. रंगमंचावरील या नाटय़गत शब्दांना त्यांच्या संकल्पनात्मक अर्थापलीकडचे अर्थ प्राप्त होतात. लिखित शब्दांतून जरी एक निश्चित असे अर्थनिर्णयन व्यक्त होत असले तरी प्रत्यक्ष प्रयोगावेळी सादरीकरणाद्वारे त्यांना एक आगळे रूपनिर्णयन प्राप्त होते. लिखित शब्दांतून आशय अभिव्यक्ती होत असली तरी नटाच्या सूक्ष्म वाचिक- आंगिक अभिनयाचीही त्यासाठी तितकीच मदत होत असते . प्रत्यक्ष नाटय़ प्रयोगाच्या वेळी रंगमंचावर एक नट सोडल्यास नाटककार, दिग्दर्शक, नेपथ्यकार, संगीतकार, प्रकाश योजनाकार किंवा अन्य आनुषंगिक मदतनीस कोणीही उपस्थित नसतात, पण तरीही या साऱयांच्या एकत्रित योगदानातून नाटय़ प्रयोग आकाराला येतो.
प्राचीन अपरिष्कृत लोकनाटय़ परंपरेत, विधिनाटय़ात, नृत्यनाटय़ात, मूकनाटय़ात शब्दांशिवायही नाटय़ सादर होत होते. आजही संवादविरहित नाटय़ प्रयोग करणारे रंगकर्मी दिसतात. शब्द न वापरता होणाऱया प्रयोगातून सामान्यत स्थूल स्वरूपाच्या सार्वत्रिक भावना तीव्रपणे अभिव्यक्त करता येतात, पण विवक्षित नेमक्या भावना व्यक्त करणं थोडे अवघडच असते. वैचारिक, तार्किक, विश्लेषणात्मक स्वरूपाचा संवाद साधताना नाटय़ प्रयोगात शब्दांचा वापर अपरिहार्य ठरतो. अर्थात नाटक सादर करताना शब्दवेधी आणि रूपवेधी असे दोन्ही प्रयोग होऊ शकतात. मूलत रंगमंचीय अवकाशाची भाषा ही हावभावांची, रंगांची, ध्वनींची अशा अनेक संकेत चिन्हांची आगळीवेगळी अशी भाषा असते. नाटककार, दिग्दर्शक, नट, नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार, संगीतकार आदी अनेक घटकांनी एकत्र येऊन घडवलेली ती भाषा असते. अशा प्रकारे भाषा व भाषेतर गोष्टींचे काव्यात्म कार्य रंगभूमीवर महत्त्वाचे ठरते. भारतीय नाटय़शास्त्रात संवादाइतकेच महत्त्व अभिनयाला दिलेले असून अभिनयाची कल्पना अत्यंत व्यापक अर्थाने घेताना त्यात सर्व प्रयोग घटकांचाही विचार केलेला आहे. संवादासोबतच दृश्यात्मकतेलाही त्यात महत्त्व आहे. अगदी अॅरिस्टॉटलच्या पोएटिक्समध्येही पात्र, संवाद, कथानक यांच्या बरोबरीने भव्य दृश्यात्मकतेलाही महत्त्व दिलेले दिसते.
आपल्या या लेखमालेत आपण वेगवेगळ्या कलांमधील दृश्य-अदृश्याविषयी, मूर्त-अमूर्ताविषयी चर्चा करीत असल्यामुळे त्या अनुषंगानेच आपण विषय विस्तार करणार आहोत. त्यामुळे नाटक या प्रयोगात्म कलेचे अनेक घटक असले तरी विस्तारभयास्तव त्याविषयी थोडक्यात आनुषंगिक मांडणी करून आपण आपल्या मूळ विषयाची सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण पाहिलं की, नाटक ही आशयप्रधान कला असली तरी तिच्या प्रयोग रूपाला विशेष महत्त्व असते. नाटककाराने लिहिलेले संवाद व दिलेल्या रंगसूचनांतून दिग्दर्शक व इतर घटकांच्या मदतीने उभा राहणारा नाटय़ावकाश व कालावकाश यातून नाटकाचा एक समग्र सौंदर्यानुभव सिद्ध होत असतो. थोडक्यात, नाटक ही दृकश्राव्य प्रतिचित्रणात्मक प्रयोगकला असून ती कालावकाशविशिष्ट असते. नाटकातील कालावकाशाचा विचार करता एक गोष्ट स्पष्ट होते की, त्यात एकाच वेळी दोन कालावकाश असतात. म्हणजे एका पातळीवर प्रत्यक्ष प्रेक्षक म्हणून आपण दुपारी चार वाजता रवींद्र नाटय़ मंदिरात नाटय़ प्रयोगासाठी उपस्थित असतो तर त्याच क्षणी नाटय़ प्रयोगात घनदाट जंगलात रात्री सुरू असलेली घनघोर लसुरू असते. याचा अर्थ नाटय़ प्रयोगाच्या वेळी प्रेक्षक दोन काळांचा व दोन अवकाशांचा अनुभव घेत असतो. तर अशा या नाटय़ावकाश व कालावकाश यातून आकारणाऱया दृश्य-अदृश्याच्या खेळाविषयी जाणून घेऊ या पुलेखात
(लेखिका साहित्य संस्कृती मंडळाच्या
सचिव, कवयित्री, चित्रकार आहेत.)


























































