Pune Moshi Tragedy – कामगार कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली, मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील तीन मजली इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळला. गेल्या तीन-चार दिवसांपासून बचावकार्य सुरू आहे. एका कामगाराचा मृत्यू झाला असून, आठ कामगार कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. अशा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळी येतील, अशी मृतांच्या नातेवाईकांना अपेक्षा होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी न येता, शुक्रवारी रात्री वाकड येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये महापौर, आमदारांबरोबर बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांच्या या असंवेदनशील व्यवहारामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांना केवळ प्रसिद्धीचा सोस!

‘मोशीसारख्या संवेदनशील घटनेवेळी मुख्यमंत्र्यांनी एसी हॉलमधील बैठकीत नव्हे, तर दुर्घटनास्थळी दिसायला पाहिजे. महाराष्ट्राला आता प्रसिद्धीचे फोटो नको आहेत. उत्तरदायित्व, निर्णयक्षमता आणि परिणाम हवा आहे,’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुक पेजवरून केली आहे.

महापालिकेच्या मोशीतील कचरा डेपोतील कचऱ्याचा सहा ते सात मजली उंच डोंगर बुधवारी (दि. ८) दुपारी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या कामगार कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली, तीन मजली इमारतीवर कोसळला. यामध्ये काही कामगारांचा मृत्यू झाल्याने मृतांच्या नातेवाइकांनी टाहो फोडला आहे.

मोशी कचरा डेपो दुर्घटना- ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 कामगारांचा मृत्यू, एकाचा अद्यापही शोध सुरू; नातेवाईकांना अश्रू अनावर

घटना गंभीर असून, संकटाच्या प्रसंगी राज्य सरकार आणि महापालिकेने युद्धपातळीवर काम करायला हवे होते. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी यावे, सर्व यंत्रणांना जबाबदार धरून बचावकार्यातील अडथळा दूर करावा, अशी अपेक्षा कामगारांच्या नातेवाइकांची होती. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी रात्री मुंबईहून नागपूरकडे जात असताना वाकड येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आले. आमदार महेश लांडगे, महापौर रवि लांडगे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली.