भाजपने मेलेल्या गायींच्या टाळूवरचं लोणी खाल्लं; 100 कोटींचा घोटाळा केला, हे तुमचं हिंदू राष्ट्र? – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानमध्ये मोठा गोशाळा घोटाळा उघडकीस आला आहे. मृत गायींना जिवंत दाखवून कोट्यवधींचे अनुदान लाटणे आणि टॅग्जचा वापर करण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली. एका बाजुला तुम्ही गोवंश हत्याबंदीचे कायदे आणता, त्याच्यासाठी झुंडबळी घेता आणि तुम्हीच मृत गोमातेच्या टाळूवरचे लोणी खाता. हे तुमचे हिंदू राष्ट्र? असा सवाल संजय राऊत यांनी रविवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला.

राजस्थानमध्ये गोशाळांना अनुदान मिळले. साधारण 100 गोशाळा बोगस निघाल्या असून भाजपच्या लोकांनी मेलेल्या गायींवरही अनुदान घेतले आहे. भाजपचे राज्य असलेल्या राजस्थानमध्ये हे चालले आहे. एका बाजुला तुम्ही गोवंश हत्याबंदीचे कायदे आणता, त्याच्यासाठी झुंडबळी घेता आणि तुम्हीच मृत गोमातेच्या टाळूवरचे लोणी खाता. मृत गायींवर घेतलेले 100 कोटींच्यावरील अनुदान हा गंभीर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, हिंदुत्ववादी किंवा सरसंघचालक मोहन भागवत काय करताहेत? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

हिंदुत्वाच्या नावाने ही लूट चालली असून सगळ्या गोशांची नावे श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या नावाने आहे. ठाकूरची गोशाळा, श्रीराम गोशाळा, श्रीकृष्ण गोशाळा अशी सर्व नावे असून याची यादीही माझ्याकडे आहे. कुठल्या प्रकारचे हिंदुत्वाचे मॉडेल किंवा कोणत्या प्रकारचे हिंदू राष्ट्र तुम्ही या देशामध्ये राबवू इच्छिता? राम मंदिर लुटायचे, गोशाळा लुटायच्या, कुंभमेळ्यात लूट करायची हे तुमचे हिंदू राष्ट्र? हिंदू संस्कार, संस्कृती आणि धर्माच्या नावावर लूट करणे ही तुमच्या हिंदू राष्ट्राची झलक आहे. हे असे हिंदू राष्ट्र आम्हाला नकोय, असेही संजय राऊत म्हणाले.

रोखठोक – हिंदू राष्ट्राची झलक

भाजपला देशाच्या स्थैर्याची, शांततेची चिंता नाही

जम्मू-कश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांना कोट्यवधींची ऑफर देण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, टीव्हीकेच्या आमदारांना 35-35 कोटींमध्ये खरेदी करण्याचा प्रयत्न झाला. आमदारांना ऑफर देऊन तामीळनाडूचे सरकार पाडण्याचा करण्यात आला. महाराष्ट्रात, पश्चिम बंगालमध्येही तेच झाले. आता जम्मू-कश्मीर सारख्या सीमावर्ती भागात सुद्धा भाजप हे उपद्व्याप करत असेल तर यासारखे देशविघातक कृत्य नाही. सीमावर्ती राज्यात कायम शांतता आणि स्थिर सरकार असणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. पण कश्मीर आणि पंजाबसारख्या राज्यात हे असे खेळ करत असतील तर त्यांना देशाच्या स्थैर्याची आणि शांततेची अजिबात चिंता नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे

दरम्यान, ‘मराठीत बोला’ असे सांगितले म्हणून रेल्वेच्या टीसींनी एका प्रवाशाला दमदाटी करत नंतर तासभर अंधेरी स्थानकातील कार्यालयात डांबून ठेवल्याचे समोर आले आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. विधानसभेत ते अधूनमधून हिंदीत भाषण करत असले तरी महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती ही विधाने त्यांनी अलीकडच्या काळात जोरात केली. महाराष्ट्रात मराठीची सक्ती असेल तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. तिथे मराठीत बोला असे सांगणाऱ्या मराठी माणसाला त्रास का होतोय याचे उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे. त्यांच्यामध्ये मराठी आत्मा आणि मराठी स्वाभिमान जिवंत असेल तर ते उत्तर देतील, असे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातला शतकातील सर्वात मोठा भ्रष्टाचार कुंभमेळ्यात असेल; गिरीश महाजनांचा ‘चंपतराय’ उल्लेख करत संजय राऊत यांचा घणाघात