दाऊदने ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवलाय…; पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, मुंबईत खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आल्याने रविवारी पहाटे एकच खळबळ उडाली. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ ताज हॉटेलमध्ये सुरक्षा मोहिम रावबत सखोल तपासणी केली. तपासणीअंती ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी मध्यरात्री 12.13 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून “दाऊदने ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे,” असा दावा केला. यानंतर ताज हॉटेलमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला. त्वरित मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली.

या अलर्टनंतर कुलाबा पोलीस, गुन्हे शाखा आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाची पथके ताज हॉटेलमध्ये दाखल झाली. हॉटेलमध्ये व्यापक सुरक्षा तपासणी सुरू केली. हॉटेलची कसून तपासणी करण्यात आली. सखोल तपासणीनंतर परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक आढळले नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. यानंतर बॉम्बची धमकी अफवा असल्याचे निष्पन्न झाले.

धमकीचा फोन नवी मुंबईतील तुर्भे भागातून आल्याचे तांत्रिक तपासातून निष्पन्न झाले. वापरलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आणि आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. यासाठी संबंधित अधिकारी तुर्भे पोलिसांच्या मदतीने काम करत आहेत.