
दापोली तालुक्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांनी दापोली पोलीस निरीक्षकांना निवेदन देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मागील आठ दिवसांत पोक्सो कायद्यांतर्गत चार गंभीर गुन्हे दाखल झाल्याने पालक, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा घटनांमुळे मुली व पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवावी, शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी, विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे तसेच पालक, सामाजिक संस्था आणि प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी एसटी बसमधील विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या घटनेचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला असून अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधितांवर कठोर शिस्तभंगात्मक कारवाई आणि प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. वळणे एमआयडीसी परिसरातील हॉटेलमध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणाचाही उल्लेख करून संबंधित हॉटेलची सखोल चौकशी करावी आणि आवश्यक असल्यास त्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पोक्सो अंतर्गत दाखल झालेल्या सर्व प्रकरणांचा जलद तपास करून आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, तसेच महिला, विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी पोलिस प्रशासनाने विश्वासार्ह आणि प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा सर्वपक्षीय शिष्टमंडळाने व्यक्त केली. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न हा संपूर्ण समाजाचा असून, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे यावर प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.





























































