
महिलेच्या बेडरूममध्ये पोलिसांनी रात्रीच्या वेळेस जाऊन केलेल्या तपासावर उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. पोलिसांचे हे वर्तन गोपनीयतेवर गंभीर घाला घालणारे आहे, असे ताशेरे न्यायालयाने ओढले.
एका महिलेने व तिच्या पतीने ही याचिका केली होती. एका चोरीच्या तपासासाठी पोलीस अचानक रात्री साडेअकराच्या सुमारास घरात आले. त्यांच्यासोबत महिला अधिकारी नव्हती. पोलीस थेट माझ्या बेडरूममध्ये आले. त्यांनी माझा मोबाईल हिसकावून घेतला. वॉरंटशिवाय पोलिसांनी घरात प्रवेश केला, असा आरोप महिलेने याचिकेत केला होता. या याचिकेवर न्या. उर्मिला जोशी-फाळके व न्या. नवेदिता मेहता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
एखाद्या महिलेच्या बेडरूममध्ये पोलिसांनी रात्रीच्या वेळेस प्रवेश करणे हा प्रकार त्या महिलेच्या प्रतिष्ठेला मारक आहे, अशा शब्दांत खंडपीठाने पोलिसांचे कान उपटले. महिलेच्या घरात जाणे हा तपासाचा भाग होता, हा पोलिसांचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. तपासाच्या नावाखाली नागरिकांचे मूलभूत अधिकार पायदळी तुडवू नका, असे कोर्टाने बजावले. या महिलेला भरपाई म्हणून दहा हजार रुपये द्यावेत, असे आदेश कोर्टाने राज्य शासनाला दिले.





























































