पंधरा दिवसांत 98 अल्पवयीन मुलांचा शोध, अहिल्यानगर पोलिसांची ‘ऑपरेशन शोध’ मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन शोध’ या विशेष मोहिमेत अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी १५ दिवसांत ९८ बेपत्ता बालकांचा शोध लावला आहे. शोधलेल्या सर्व बालकांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ८ ते २३ जून २०२६ या कालावधीत ही विशेष मोहीम जिल्हाभर राबविण्यात आली.

हरवलेल्या अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे कुटुंबीयांपर्यंत पोहोचविणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांतील विशेष पथके तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने समन्वयाने काम केले. मोहिमेदरम्यान ९० मुली आणि ८ मुले अशा एकूण ९८ बेपत्ता बालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. अल्पवयीन मुलांचे अपहरण, बेपत्ता होण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा भविष्यातही राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय अधिकारी गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि त्यांच्या पथकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

विशेष पथकांकडून शोध

मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलिसांनी गोपनीय माहिती संकलन, तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्याचा वापर तसेच इतर जिल्ह्यांतील पोलिसांशी प्रभावी समन्वय साधला. प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्याने स्वतंत्र विशेष पथके तयार करून शोधमोहीम राबविली. त्यामुळे कमी कालावधीत मोठ्या संख्येने बेपत्ता बालकांचा शोध घेणे शक्य झाले.