मुंबईच्या पाणीसाठ्यात वाढ; धरणांमध्ये 49.93 टक्के पाणीसाठा, विहार पूर्ण भरले तर तुळशीही ओव्हरफ्लो होण्याच्या उंबरठ्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून, सोमवारी सकाळपर्यंत एकूण 49.93 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, सातही धरणांमध्ये मिळून 7 लाख 22 हजार 649 दशलक्ष लिटर इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात 44.58 टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, अप्पर वैतरणा धरणात 28.38 टक्के पाणीसाठा आहे. मोडक सागर 80.64 टक्के, तानसा 78.46 टक्के, मिडल वैतरणा 92.84 टक्के, विहार 100 टक्के, तर तुळशी धरण 99.28 टक्के भरले आहे.

महापालिकेच्या अहवालानुसार, 7 जुलै रोजी रात्री 9 वाजता विहार धरण ओव्हरफ्लो झाले, तर त्याच दिवशी रात्री 11.43 वाजता तुळशी धरणही ओसंडून वाहू लागले. गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे.

13 जुलै रोजी सकाळी 6 वाजता नोंदविण्यात आलेल्या अहवालानुसार, मागील 24 तासांत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची नोंद झालेली नाही. मात्र, वरच्या भागातून सुरू असलेल्या पाण्याच्या आवकेमुळे धरणांतील पाणीसाठ्यात किरकोळ वाढ कायम राहिली आहे.

जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर मुंबईच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, शहराच्या वार्षिक पिण्याच्या पाण्याच्या गरजेपैकी जवळपास निम्मा साठा धरणांमध्ये उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आगामी काळातील पाणीटंचाईची चिंता मोठ्या प्रमाणात कमी झाली असून, महापालिकेलाही मोठा दिलासा मिळाला आहे.