
सध्या देशभरात E20 पेट्रोलवरील चर्चांना उधाण आले आहे. या इंधनाच्या वापरामुळे अनेकांच्या वाहनांचे नुकसान झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही फेमस इन्फ्लुएन्सर्सनी या विषयावर सविस्तर व्हिडीओ तयार करून सरकारवर निशाणा साधला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात खोटी आणि बदनामीकारक माहिती पसरवल्याप्रकरणी नागपुरात चार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, यामध्ये प्रसिद्ध युट्युबर आणि राजकीय नेते मनीष कश्यप यांच्या सह चारजणांचा समावेश आहे. भाजप सोशल मीडिया सेलचे शहर अध्यक्ष शिशिर त्रिपाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरून नागपूर शहर सायबर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मनीष कश्यप यांच्याव्यतिरिक्त ‘देशी बॉईज’ (desi_boysncr) हे इन्स्टाग्राम अकाउंट आणि हर्षित राठी व अंकलेश इनवाती या इन्फ्लुएन्सर्सची नावे या एफआयआरमध्ये (FIR) समाविष्ट आहेत.
तक्रारीनुसार, गेल्या वर्षी भाजप सोडून जन सुराज्य पक्षात (JSP) प्रवेश केलेले मनीष कश्यप यांनी 3 जुलै रोजी एक युट्युब व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये E20 इंधनाबाबत आणि नितीन गडकरी यांच्याबाबत खोटी माहिती असल्याचा आरोप आहे. याशिवाय, अन्य तीन आरोपींनी इथॅनॉल मिश्रित इंधनाशी संबंधित व्हिडिओंमध्ये केंद्रीय मंत्र्यांविरोधात अपशब्दांचा वापर केला, ज्याचा उद्देश खोटी माहिती पसरवून सार्वजनिक शांतता भंग करणे आणि त्यांची बदनामी करणे हा होता, असा आरोप त्रिपाठी यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 356, 352 आणि 296 सह माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम 67 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
E20 पेट्रोलमुळे जुन्या वाहनांवर परिणाम? ARAI च्या अहवालात माहिती
देशभरात E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) वापराला प्रोत्साहन दिले जात असताना ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) च्या एका अहवालात E10 सुसंगत वाहनांमध्ये E20 इंधन वापरल्यास काही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात, असे नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसला तरी केंद्र सरकार आणि वाहन उत्पादकांसाठी तो महत्त्वाचा संदर्भ मानला जातो. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.



























































