अकरावीच्या प्रवेशासाठी आजपासून आणखी एक संधी; 22 जुलैपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत ११ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेतील मुलींसाठी राबवण्यात आलेल्या फेरीत ४७ हजार ३३० विद्यार्थिनींनी प्रवेश निश्चित केला. त्यापैकी ४३ हजार ९८५ प्रवेश केंद्रीभूत (कॅप) प्रवेशांद्वारे, तर ३ हजार ३४५ प्रवेश राखीव कोट्यातून झाले. आता प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी १६ ते २२ जुलै या कालावधीत आणखी एक प्रवेश फेरी राबवली जाणार आहे.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित आणि दोन विशेष फेऱ्या राबवण्यात आल्या आहेत. मुलींसाठीच्या विशेष फेरीत ५३ हजार ८२४ विद्यार्थिनींना प्रवेश जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी ४७ हजार ३३० विद्यार्थिनींनी प्रवेश निश्चित केला. आतापर्यंत झालेल्या फेऱ्यांमध्ये प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांसाठीची फेरी १६ ते २२ जुलै या कालावधीत राबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना १६ ते १८ जुलै या कालावधीत नोंदणी करणे, प्रवेश अर्जाच्या भाग १ मध्ये दुरुस्ती करणे, महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवणे व अर्ज अंतिम करणे शक्य होणार आहे. २० जुलै रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

अकरावीचे वर्ग सुरू अमरावती विभागातून ३९७७, छत्रपती संभाजीनगर विभागातून ४८१२, कोल्हापूर विभागातून ३३९१, लातूर विभागातून २५१८, मुंबई विभागातून १५७८०, नागपूर विभागातून ४६८८, नाशिक विभागातून ४५२६, पुणे विभागातून ७६३८ विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला. आतापर्यंत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्याच्या सूचना याआधीच देण्यात आल्या आहेत.