
स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून देशात नावलौकिक मिळवलेले नवी मुंबई शहर आज हवाईमार्गे जगाशी जोडले गेले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा शुभारंभ झाला. अबुधाबीहून आलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या ‘आयएक्स-२०८’ या विमानाचे सकाळी १० वाजून २० मिनिटांनी विमानतळावर मोठ्या जल्लोषात लँडिंग झाले. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचा शुभारंभ करणाऱ्या विमानाला वॉटर कॅननने हवेत पाण्याचे उंच फवारे उडवून सलामी दिली आणि विमानतळावर उपस्थित नागरिकांनी व प्रवाशांनी टाळ्यांचा कडकडाट करून या विमानाचे स्वागत केले.
नवी मुंबई विमानतळावरून २५ डिसेंबर २०२५ पासून देशांतर्गत विमानसेवेचा शुभारंभ झाला आहे. एप्रिल महिन्यापासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली विमानतळ व्यवस्थापनाने सुरू केल्या होत्या. मात्र अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाल्याने हे वेळापत्रक लांबणीवर पडले. अखेर आजपासून नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली. प्रारंभी अबुधाबी-नवी मुंबई या मार्गावर आठवड्यातून तीन उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. या सेवेमुळे प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतुकीलाही चालना मिळणार असून मुंबई महानगर प्रदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार तसेच निर्यात क्षेत्रासाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार असल्याचे मत उद्योग विश्वातून व्यक्त केले जात आहे.
दररोज दीडशे विमानांचे लँडिंग, टेकऑफ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या २०० दिवसांत आंतरराष्ट्रीय उड्डाणाची सुरुवात झाली आहे. या कालावधीत सुमारे २३ लाख प्रवाशांनी विमानतळाचा वापर केला आहे. नवी मुंबई विमानतळावर दररोज १५० विमानांचे लँडिंग आणि टेकऑफ होत आहे. वर्षभरात हा आकडा सुमारे अडीचशेपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
माऊलींचे शाही नीरास्नान
माऊली नामाचा अखंड जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात, भगव्या पताका उंचावीत, वैभवी लवाजम्यासह पंढरीकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने भक्तिमय व आल्हाददायक वातावरणात बुधवारी दुपारी एकच्या सुमारास पुणे जिल्ह्याचा निरोप घेतला. माऊलींच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र जलाने ‘माऊली… माऊली’च्या नामस्मरणात दुपारी १ वाजता शाही स्नान घालण्यात आले. या वेळी नीरा नदीकाठी लाखो वैष्णवांचा मेळा भरल्याचे पाहावयास मिळाले. बुधवारी सकाळी महर्षी वाल्मीकी यांच्या वाल्हेनगरीचा निरोप घेऊन माउलींचा पालखी सोहळा वैभवी लवाजम्यासह न्याहारीसाठी पिंपरे खुर्द विहीर येथे पोहोचला.































































