
<< साधना गोरे
[email protected]
काही शब्द, वाक्प्रचार आपल्या इतक्या परिचयाचे असतात की, आपण त्यांच्या मुळाशी जाण्याचा फारसा प्रयत्न करत नाही, पण त्यांचं मूळ लक्षात आलं की, आपण अचंबित होतो ते नवं काही गवसल्याच्या आनंदाने. ‘खिसा’ या शब्दाचा आणि ‘कास धरणे’ या वाक्प्रचाराचा एकमेकांशी काही संबंध असेल असा तुम्ही कधी विचार केला आहे? पण त्यांचा संबंध आहे आणि तो फार जवळचा आहे.
पण हा संबंध पाहण्याआधी आपण ‘कटि’ किंवा ‘कटी’ या शब्दाविषयी पाहू. संत तुकारामांच्या अभंगात ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया’ हे विठ्ठलाचं वर्णन आपण अनेकदा वाचलं, ऐकलं आहे. यातील ‘कटी’ म्हणजे कंबर. कड, देहाचा मध्यभाग असाही त्याचा अर्थ होतो. संस्कृत ‘कटि’ शब्दाचे ‘कड’ आणि ‘कट’ असे दोन अपभ्रंश होतात. ‘कड’पासून कडदोरा शब्द तयार झाला. त्याचा मूळ संस्कृत शब्द ‘कटिदोरकः’ असा आहे. तर ‘कट’ शब्द वरील अभंगात आला आहे. कृ. पां. कुलकर्णी म्हणतात, मराठीतील ‘कडे’ हा शब्दयोगी अव्यय हासुद्धा या ‘कटि’ शब्दापासूनच आला आहे.
कमरेपासून पायापर्यंत अंघोळ करणं म्हणजे ‘कटिस्नान’. निर्धारपूर्वक एखाद्या कामाला वाहून घेणे या अर्थाने आपण ‘कटिबद्ध’ हा शब्द वापरतो. याचा शब्दशः अर्थ कंबर कसून म्हणजे बांधून कामाला लागणं. चार पायांवरचा माणूस दोन पायांवर चालू लागला. या प्रक्रियेत मानवी मणका आणि मणक्याच्या खालील भाग म्हणजे कंबर यांत आमूलाग्र बदल झाला. कमरेमुळे आपल्याला वाकणं, डाव्या-उजव्या बाजूला वळणं सहज शक्य होतं. शिवाय चालणं, धावणं, बसणं, उठणं या सर्व पायांच्या हालचाली कमरेच्या सांध्याशी जोडलेल्या असतात. कमरेच्या या वैशिष्ट्यामुळेच ‘कंबर कसून कामाला लागण्याची’ रीत पडली असावी.
कमरपट्ट्याला संस्कृतमध्ये ‘कटिबंध’, ‘कटिकांची’ असे शब्द आहेत. उदा. ‘कटिकांचीवरी हिरे थोर, जैसे दिनकर जडियेले’. तर ज्या स्त्री/पुरुषाने कामविकार आटोक्यात ठेवला आहे, त्यांना ‘कटिबंद’ म्हटलं जातं. भूगोलात आपण ‘उष्ण कटिबंध’, ‘शीत कटिबंध’, ‘समशीतोष्ण कटिबंध’ असे शब्द ऐकले आहेत. याचा अर्थ पृथ्वीवरील वातावरणाचा काल्पनिक पट्टा असा आहे.
‘तुळशीहार गळा, कांसे पितांबर’ या अभंगातील ‘कांसे’ म्हणजे कासोटा. ‘कास’ किंवा ‘कांस’ म्हणजे धोतर, लुगडं यांचा ‘कासोटा’. ‘कास’ किंवा ‘कासोटा’ या शब्दांना घालणे, खोचणे, फेडणे ही क्रियापदे वापरली जातात. इथं सांगायचा मुद्दा हा की, कामाचा निर्धार करणं या अर्थाने ‘कंबर कसणं’प्रमाणे ‘कासोटा बांधणं’ असंही म्हटलं जातं. कुलकर्णींनी ‘कासोटा’ शब्दाचे मूळ सांगताना संस्कृतमधील ‘कच्छ’, ‘कक्षा’, ‘कक्षापट’ हे शब्द सांगितले आहेत. तसेच देशी प्राकृतमधील ‘कच्छटी’ हा शब्दही दिला आहे.
यादवकालीन मराठीत ‘कंबर कसणं’ या अर्थाने ‘कास घालणं’, तर युद्धासाठी सिद्ध होणं या अर्थाने ‘कासणे’ हे वाक्प्रचार वापरात होते. एखाद्याच्या आश्रयाला जाणे या अर्थाने ‘कास धरणे’ हा शब्दप्रयोग आपण अनेकदा वापरतो. तुकोबांच्या अभंगातही ‘तरी आम्ही तुझी धरियेली कास’ म्हटलं आहे.
‘कटी’, ‘कास’, ‘कासोटा’ या साखळीतला आणखी एक शब्द म्हणजे ‘कसा’. ‘कसा’ या शब्दाच्या अनेक अर्थांपैकी एक अर्थ आहे अंगरखा किंवा टोपडे इत्यादिकांचा बंद, पैसे ठेवण्याकरता हात दीड-हात लांब व अरुंद कमरेला बांधायची लांबट पिशवी, झोळणा, बटवा वगैरेची दोरी, नाडी. पूर्वी अशा पिशव्या स्त्री-पुरुष दोघेही वापरत. त्यात पैशांबरोबरीने पान, सुपारी अशा इतरही गरजेच्या वस्तू ठेवल्या जात. बांधणे, आवळणे या अर्थाचे ‘कसणे’ हे क्रियापद मराठीत आहे आणि हा शब्दही याच साखळीतला आहे. पंजाबीत ‘कस्स’, गुजराती – हिंदी – सिंधीमध्ये ‘कस’ असा शब्द आहे. कस म्हणजे दोरी या अर्थाचा विचार करायचा तर पंजाबीमध्ये ‘कश्क’ म्हणजे खोगिराची दोरी, सिंहलीमध्ये ‘कस्’ म्हणजे चाबूक. संस्कृतमधील ‘कस’, ‘कष्’ यांपासून ‘कसा’ हा शब्द आल्याचं कुलकर्णींनी म्हटलं आहे. पुढं ते असंही म्हणतात की, यासंदर्भात लांब, अरुंद पिशवी या अर्थाचा फार्सातील ‘कीसा’ शब्द चिंत्य आहे.
आता आपण ‘खिसा’ शब्द ज्या अर्थाने वापरतो तो संस्कृतमधील ‘कस’पासून येऊ दे की फार्सीमधील ‘कीसा’पासून; पण आजही पँटचा खिसा कमरेच्या जवळच असतो. शिवाय मराठी आणि हिंदीतही ‘खिसा’ शब्दाशी साधर्म्य असणारे उच्चार आहेत. तसंच अरबीमध्ये ‘कीसा’ किंवा ‘खीसा’, हिब्रूमध्ये ‘किस्स’, सीरियाईमध्ये ‘केसा’ असे उच्चार आहेत.



























































