
ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ व अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर यांनी 15 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय सोशल मीडियावरून जाहीर केला आहे. दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होत आहोत, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
आदिनाथ आणि ऊर्मिला यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही धक्कादायक माहिती दिली आहे. खूप विचारमंथनानंतर त्यांनी परस्पर संमतीने आणि अत्यंत सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. पती-पत्नी म्हणून आमचा प्रवास इथेच थांबत असला तरी आमची लाडकी लेक जिजा हीच आमचे सर्वस्व आहे. तिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र उभे राहू. तिला आई-वडिलांचे भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि खंबीर पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही अत्यंत आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने तिचे ‘को-पॅरेंटिंग’ करणार आहोत, असे त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे.



























































