
मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतील पदवी, पदव्युत्तर आणि चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार आता 30 जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार सर्व महाविद्यालयांनी काटेकोरपणे ही प्रवेश प्रक्रिया 17 ते 30 जुलै 2026 या कालावधीत पूर्ण करायची आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करण्याची ही शेवटची संधी असणार आहे. चारही विद्या शाखेतील विविध विषयांचा समावेश असलेली ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक आहे. विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमांसाठी https://muugadmission.samarth.edu.in आणि पदव्युत्तर व चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांसाठी https://muadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर प्रवेशपूर्व नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे त्या महाविद्यालयांचे ऑनलाइन/ऑफलाइन अर्ज भरणे अनिवार्य आहे.
पदवी, पदव्युत्तर आणि चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देऊन जागा रिक्त राहिल्यास महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर गुणवत्ता यादी जाहीर करून विद्यार्थ्यांना प्रवेशित करावे असे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.


























































