म्हाडा आम्हाला आणखी किती दिवस वेठीस धरणार? तीन महिने झाले तरी लॉटरीची तारीख ठरेना, अर्जदारांचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीन महिने उलटून गेले तरी म्हाडाला मुंबईतील २,६४० घरांच्या सोडतीसाठी अद्याप मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे ७५ हजार अर्जदारांची घोर निराशा झाली असून त्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न लांबणीवर पडले आहे. “म्हाडा आम्हाला आणखी किती दिवस वेठीस धरणार?” असा संतप्त सवाल आता अर्जदारांकडून उपस्थित केला जातोय.

म्हाडाने ३० मार्च रोजी २,६४० घरांसाठी सोडत जाहीर केली होती. या घरांसाठी तब्बल ७५,३६६ अर्ज प्राप्त झाले आहेत. सुरुवातीला १५ मे रोजी सोडतीची तारीख निश्चित केली होती. परंतु अल्प प्रतिसादामुळे अर्ज नोंदणीस मुदतवाढ देऊन सोडत ५ जूनला काढण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा मुदतवाढ देऊन विधान परिषद निवडणुकीसाठी लागू असलेली आचारसंहिता संपल्यानंतर लॉटरीची तारीख जाहीर करण्यात येईल, असे म्हाडाकडून कळविण्यात आले होते.

एप्रिलमध्ये मी क्रेडिट कार्डद्वारे अनामत रक्कम भरली होती. आता जुलै अर्ध्यावर आला तरी लॉटरीची तारीख जाहीर झालेली नाही. घराचे स्वप्न तर दूरच राहिले, पण क्रेडिट कार्डचे व्याज भरण्याची वेळ आमच्यावर आली आहे.

– विशाल जाधव, अर्जदार