घोरपडी नदीवरील पूल मोजतोय अखेरच्या घटका, शहापुरात ढासळणारे कठडे… पिलरला तडे… जागोजागी खड्डे; ‘सावित्री’ सारखी दुर्घटना घडण्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहापूर-किन्हवली मार्गावरील घोरपडी नदीवरील पूल सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. ढासळणारे कठडे… पिलरला तडे… जागोजागी खड्डे पडल्याने कोणत्याही क्षणी हा पूल कोसळण्याची भीती आहे. रात्रीच्या वेळेस महाडच्या ‘सावित्री’ सारखी एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल स्थानिकांनी केला आहे. ७० वर्षे जुना असलेला हा पूल अपघाताला आमंत्रण देणारा ठरला असून त्याच्या डागडुजीकडे प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केले आहे.

घोरपडी नदीवरील पूल हा केवळ शहापूर-किन्हवलीपुरता मर्यादित नसून मुरबाड तालुका तसेच माळशेज, किन्हवली, डोळखांब, टाकीपठार, नडगाव, लेनाड, सरळगाव, समृद्धी महामार्गाकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. शहापुरातील सुमारे ७० टक्के नागरिक या मार्गावरून दैनंदिन प्रवास करतात. या पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून पिलर्सलाही तडे गेले आहेत. सदर पूल धोकादायक झाला असून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. तरीदेखील ग्रामस्थ व वाहनचालक यावरून प्रवास करीत आहेत. यामुळे हजारो प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान एमएसआरडीसी विभागाने त्वरित पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

… अन्यथा मोठी जीवितहानी होईल
घोरपडी नदीवरील पुलाची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी तसेच आपत्कालीन सेवा वाहने ये जा करतात. पुलाची झालेली पडझड आणि संरक्षण भिंतींचे नुकसान याबाबत आम्ही एमएसआरडीसी प्रशासनाला लेखी पत्र देऊन या समस्येकडे लक्ष वेधले होते. मात्र यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालावे. तसेच वेळेत उपाययोजना न झाल्यास वाहतूक ठप्प होण्याबरोबरच मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे जीवरक्षक टीमचे अध्यक्ष समीर चौधरी यांनी सांगितले.