Duleep Trophy 2026 – ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; थेट कर्णधारपदाची माळ गळ्यात पडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. केवळ एकच सामना संघाला जिंकता आला त्यामुळे इंग्लंडने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. याच दरम्यान, आगामी Duleep Trophy 2026 साठी 15 सदस्यीय वेस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच उपकर्णधार म्हणून शम्स मुलानीची निवड करण्यात आली आहे. यांच्याव्यतिरिक्त स्टार खेळाडूंचा भरणा या संघात असणार आहे. 23 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान दुलीप करंडकाचा थरार चाहत्यांना अनुभवता येणार आहे.

गेल्या हंगामात अष्टपैलू शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखाली वेस्ट झोनने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती, आणि यावेळेस देखील शार्दुलचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, कर्णधारपद ऋतुराजला सोपवण्यात आलं आहे. आयपीएलमध्ये ऋतुराजच्या नेतृत्वात चेन्नईची कामगिरी अगदीच सुमार राहिली होती. त्यामुळे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली वेस्ट झोनचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. निवड समितीने जाहीर केलेल्या मुख्य 15 खेळाडूंच्या संघात अनेक युवा आणि अनुभवी स्टार खेळाडूंचा भरणा आहे. यामध्ये आक्रमक सलामीवीर पृथ्वी शॉ, सरफराज खान, त्याचा भाऊ मुशीर खान आणि उर्विल पटेल यांना संधी मिळाली आहे. यष्टीरक्षणाची धुरा उर्विल पटेलसह हार्विक देसाईकडे सोपवण्यात आली आहे. फलंदाजीसोबतच संघाची गोलंदाजीची बाजूही तितकीच भक्कम आणि संतुलित दिसत आहे.

FIFA World Cup 2026 – मेस्सीचं स्वप्न भंगल, अर्जेंटिनावर मात करत स्पेन दुसऱ्यांदा ठरला जगज्जेता

संघाच्या फिरकी विभागाची धुरा उपकर्णधार शम्स मुलानी, तनुष कोटियन आणि सिद्धार्थ देसाई यांच्यावर असेल. तर वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व अनुभवी शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे आणि मुकेश चौधरी यांच्याकडे असेल. मुख्य 15 खेळाडूंच्या व्यतिरिक्त निवड समितीने 6 राखीव खेळाडूंचीही निवड केली आहे, ज्यामध्ये जय गोहिल, आर्या देसाई, अर्शिन कुलकर्णी, महेश पिठिया, विशाल जयसवाल आणि राजवर्धन हंगरगेकर यांचा समावेश आहे. स्टार खेळाडूंच्या या मांदियाळीमुळे वेस्ट झोनचे विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे.