भाजप सरकार भ्याड! ही हुकूमशाही नाहीतर काय!! आदित्य ठाकरे यांचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार करणाऱ्या भाजप सरकारचा तीव्र निषेध केला. परीक्षा पेपरफुटीप्रकरणी न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या समर्थनार्थ उभ्या राहिलेल्या नागरिकांवर बळाचा वापर करणे हे भ्याड सरकारचे लक्षण असल्याची टीका त्यांनी केली.

आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून निषेध नोंदवतानाच सरकारवर सडकून टीका केली आहे. “परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीविरुद्ध न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्यांवर सरकार क्रूर बळाचा वापर करत आहे. जंतरमंतर परिसरातील इंटरनेट सेवाच सरकारने बंद केली आहे. संविधान, कायद्याचे राज्य
आणि मुक्त व निष्पक्ष निवडणुका पाळणाऱ्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात असे सरकार असू शकते का, जे शांततापूर्ण आंदोलनांवर इतकी क्रूर कारवाई करण्याचे आदेश देते? आता आपल्या देशातील राजवटीबद्दल जग काय विचार करत असेल?” असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

एकच मागणी आहे… प्रधान बदला
विडंबना म्हणजे, जेव्हा दशकभरापूर्वी भाजपने अण्णा हजारे यांच्यासोबत आंदोलन केले होते तेव्हा काँग्रेस सरकारने किमान चर्चेसाठी वरिष्ठ मंत्र्यांना तरी पाठवले होते. ते इतके क्रूर आणि सूडबुद्धीचे नव्हते. सध्याच्या सत्ताधारी पक्षात कोणालाही शिक्षणात रस नाही का? या सडलेल्या व्यवस्थेत त्यांचे मित्र किंवा कुटुंबीय अडकलेले नाहीत का? व्यवस्था बदला आणि आपला विभाग सांभाळू न शकलेल्या अकार्यक्षम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना बदला. सोनम वांगचुक, अभिजित दीपके आणि आम्ही सर्व हिंदुस्थानी तरुणांची हीच मागणी आहे” असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.

तरुणांवर बंदुका रोखणारी राजवट हिंदुस्थानविरोधी
“जेव्हा एक क्रूर राजवट चांगल्या शिक्षण व्यवस्थेची मागणी करणाऱ्या हिंदुस्थानी तरुणांवर बंदुका रोखते तेव्हा समजून घ्या की ती राजवट हिंदुस्थानविरोधी आहे. जेव्हा जग शांततापूर्ण मोर्चावर राजवटीने केलेल्या पोलीस अत्याचारांची छायाचित्रे पाहील तेव्हा त्याला कळेल की हिंदुस्थान आता लोकशाही देश राहिलेला नाही, तर एका राजवटीच्या ताब्यात गेला आहे. जेव्हा जग हे पाहील की राजवट शिक्षणातील व्यवस्थेतील अपयश मान्य करण्यास नकार देत आहे आणि मंत्र्याला तरुणांशी संवाद साधायला सांगण्याऐवजी, हुकूमशाहीत बदलली आहे” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.