जंतरमंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाणीबाबत सरन्यायाधीश म्हणतात; ‘ते’ व्हिडीओ बघण्यात रस नाही, वेळ वाया घालवू नका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या संतापजनक घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावलेल्या विद्यार्थ्यांना सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी चक्क धुडकावून लावले. या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न वकिलांनी केला. त्यावर ‘ते व्हिडीओ बघण्यात आम्हाला रस नाही. उगाच आमचा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका’, असे उत्तर सरन्यायाधीशांनी दिले.

पोलिसांच्या दडपशाहीकडे ऍड. नरेंद्र मिश्रा यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आणि तातडीने सुनावणी घेत सरकारला निर्देश देण्याची विनंती विद्यार्थ्यांतर्फे केली. त्यावर सरन्यायाधीशांनी वकिलांचे बोलणे मधेच तोडत सुनावणीला स्पष्ट नकार दिला.

न्यायालयातील संवाद

दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना केलेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेकडे वकिलांनी लक्ष वेधत तातडीच्या सुनावणीची विनंती केली.

सरन्यायाधीश ः (सुरुवातीलाच) उगाच आमचा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका.

वकील ः ‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटी आणि राष्ट्रीय परीक्षा प्रणालीत सुधारणा यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्दय़ांवर विद्यार्थी आंदोलन करीत आहेत.

सरन्यायाधीश ः थँक यू व्हेरी मच.

वकील ः पोलिसांच्या दडपशाहीचे, अतिरेकी वागणुकीचे व्हिडीओ आमच्याकडे आहेत. या व्हिडीओवरून न्यायालयाला वस्तुस्थिती लक्षात येईल.

सरन्यायाधीश ः ‘ते’ व्हिडीओ बघण्यात आम्हाला रस नाही. आम्हाला ते पाहण्यासाठी अजिबात वेळ नाहीय. वेळ वाया घालवू नका.