
जंतरमंतरवर आंदोलन करणारे जेन-झी तरुण आणि पोलिसांमध्ये आज झटापट झाली. जंतरमंतरजवळच्या संसद मार्गावर जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा लाठीहल्ला केला आणि अश्रुधुराचा मारा केला. यावेळी पाण्याच्या बाटल्यांचा मारा आणि दगडफेक झाल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. यात पाच पोलीस जखमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे तणाव वाढला आहे. दरम्यान, जंतरमंतर भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून अभिजीत दीपके यांनी सरकारवर कटकारस्थानाचा आरोप केला आहे.
दीपके यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे. आपला मार्ग शांततेचा असल्यामुळेच हे आंदोलन एक महिना चालले आहे, असेही ते म्हणाले. वेळ पडल्यास हे आंदोलन सहा महिने करू, असेही त्यांनी सांगितले.
सरकार चर्चेला तयार, प्रधान ओम बिर्लांना भेटले
आंदोलनाला देशभरातून वाढता पाठिंबा मिळत असल्याने महिनाभरापासून मौन असलेल्या सरकारने आज संसदेत चर्चेची तयारी दाखवली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी सरकार चर्चेला तयार असल्याचे सांगितले. मात्र, विरोधक प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रधान यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली.
पुन्हा झालेल्या लाठीहल्ल्यानंतर सीजेपीचे अभिजित दीपके यांनी तीव्र संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने आणखी एक कटकारस्थान रचले आहे, असा आरोप दीपके यांनी केला.




























































