आरोपींचे नाही, तर सामान्य जनतेचे रक्षण करा, हायकोर्टाने पोलिसांचे उपटले कान, गुन्हेगारांचे चोचले बंद करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai High court

आरोपींचे नाही, तर सामान्य जनतेचे रक्षण करा, असे खडेबोल उच्च न्यायालयाने बुधवारी पोलिसांना सुनावले. पोलीस गुन्हेगारांचे चोचले पुरवत असतील तर ते खपवून घेणार नाही, असा सज्जड दमही न्यायालयाने दिला.

कायद्याचे पालन करणाऱया नागरिकांच्या पाठिशी पोलिसांनी उभे राहिले पाहिजे. तसे न करता गुन्हेगारांच्या दिमतीला पोलीस लागले असतील तर ते हिंदुस्थानात अजिबात सहन केले जाणार नाही हे ध्यानात ठेवा, असेही हंगामी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने पोलिसांना बजावले.

शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रेला एका पोलीस अधिकाऱ्याने महानगर दंडाधिकाऱयांसमोर थेट व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे हजर केले होते. यावरून न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. आरोपीला अशा प्रकारे सेवा देण्याची कोणती नवीन पद्धत पोलिसांनी सुरू केली आहे. म्हात्रे अचानक खाली पडला. त्याचा रक्तदाब 100 व 160 होता. त्याला महानगर दंडाधिकाऱयांसमोर हजर करणे आवश्यक होते. यासाठी त्याला व्हिडीओ कॉन्फरंद्वारे हजर करण्यात आले, असे महाधिवक्ता मिलिंद साठये यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. यावर न्यायालयाने संताप व्यक्त केला. एखाद्या वकिलाने चुकीचा युक्तिवाद केल्यास आमचादेखील रक्तदाब एवढाच होतो. मग आम्ही पण रुग्णालयात दाखल व्हायचे का, असा सवाल खंडपीठाने केला.

केडीएमसीला चपराक

डॉक्टरांना मारहाण झाल्यास सहा तासांत त्या आस्थापनेने याचा गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. म्हात्रेने मारहाण केल्याचा गुन्हा अद्याप रुग्णालयाने दाखल केलेला नाही, असे इंडियन मेडिकल असोसिएशनने न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला प्रतिवादी करून घेत याचे उत्तर सादर करण्याचे आदेश दिले.

सीसीटीव्ही फुटेज सादर करा

मारहाणीच्या घटनेनंतर म्हात्रे रुग्णालयात दाखल झाला व नंतर तो डिस्चार्ज झाला. या रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज राज्य शासनाने सादर करावेत. डॉक्टरांना मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेजदेखील शासनाने पुढील सुनावणीत द्यावेत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. येत्या सोमवारी यावर सुनावणी होणार आहे.

राहू द्या म्हात्रेला कारागृहातच

म्हात्रेचे वय 73 वर्षे आहे. त्याला एकच किडनी आहे. तो आजारी आहे. याचा विचार करून त्याला जामीन द्यावा, अशी विनंती ऍड. सन्ना खान यांनी केली. त्यावर न्यायालयाने म्हात्रेवर चांगलेच ताशेरे ओढले. मारहाणीचा व्हिडीओ बघितला तर वाटत नाही की म्हात्रे आजारी आहे किंवा तो 73 वर्षांचा आहे. 25 वर्षांच्या तरुणासारखा तो हाणामारी करतोय. त्याने डॉक्टर व कर्मचाऱयांना बेदम मारहाण केली. तेव्हा त्याला राहू द्या थोडे दिवस कारागृहातच, असे खडेबोल न्यायालयाने सुनावले.