
गंभीर आजारांना सामोरे जाणाऱ्या गरजू रुग्णांना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या धर्तीवर मुंबई महापालिका मुख्यालयात ‘महापौर वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. महापौर निधीच्या माध्यमातून सध्या रुग्णांना २५ हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत केली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महापौर रितू तावडे, आयुक्त अश्विनी भिडे, आमदार अमित साटम, सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिश भांदिर्गे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कक्षाचा शुभारंभ झाला. यावेळी दहा रुग्णांच्या नातेवाईकांना महापौर वैद्यकीय सहायता निधीचा धनादेश प्रदान करण्यात आला.
महापालिकेत महापौर निधीतून गरजू रुग्णांना तसेच विविध आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी गरजू व्यक्तींना रुपये २५ हजारांपर्यंत मदत दिली जाते. आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू व गंभीर आजारांच्या रुग्णांना उपचारासाठी जलद आर्थिक सहाय्य मिळावे, म्हणून महापौर वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात आला आहे.
आठवड्याभरात मदतीचा धनादेश
कक्षामार्फत पात्र रुग्णांच्या अर्जाची छाननी करून, मंजुरीनंतर त्यांच्या उपचारासाठी आवश्यक ते अर्थसहाय्य संबंधित रुग्णालयाच्या नावाने धनादेशाद्वारे दिले जाणार आहे. त्यामुळे उपचारासाठी निधी थेट वैद्यकीय उपचार करणाऱ्या रुग्णालयाकडे जमा होईल.



























































