
पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे लोण आता देशभरात पसरू लागले आहे. प्रत्येक राज्यातील विद्यार्थी न्यायासाठी रस्त्यावर उतरला आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. यामुळे वातावरण तापलेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे म्हणत मोदींनी पेरफुटीच्या घटनांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर तातडीने आणि कठोर कारवाई व्हावी, यासाठी जलदगती न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे एक्स पोस्टद्वारे सांगितले. हीच पोस्ट रिपोस्ट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला.
“तुम्हीच आपल्या तरुणांच्या भविष्याचे सर्वात जास्त नुकसान केले आहे. तुम्ही केवळ आपल्या शिक्षण व्यवस्थेवर पूर्ण ताबा मिळवू दिला नाही आणि ती उद्ध्वस्त होऊ दिली नाही, तर त्याला खतपाणीही घातले आणि यासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला संरक्षण दिले”, अशी टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केली.
You are the one who has harmed the future of our youth the most.
You allowed and encouraged the total capture and destruction of our education system – and protected every person responsible for it.
The students’ demands are clear:
1. Sack Dharmendra Pradhan.
2. Apologise to… https://t.co/0MK4wPMNiK— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 23, 2026
तसेच राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या तीन मागण्यांचाही यात उल्लेख केला. धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवा, विद्यार्थ्यांची माफी मागा आणि विद्यार्थ्यांवर हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई करा, या विद्यार्थ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत, असे राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये नमूद केले.
फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी गुरुवारी सकाळी एक्सवर पोस्ट करत पेपरफुटीवर प्रतिक्रिया दिली. “देशातील तरुण वर्गाचे कल्याण आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य यापेक्षा आमच्यासाठी काहीही महत्त्वाचे नाही. पेपरफुटीच्या घटनांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर तातडीने आणि कठोर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत आणि त्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही”, असे मोदी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले.





























































