‘नीट’ पेपरफुटीवरून पालिका सभागृहात हंगामा, मोदी हाय हाय…विद्यार्थ्यांना न्याय द्या, विरोधकांकडून भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘नीट’ पेपरफुटी, 22 विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जवरून आज पालिका सभागृहात हंगामा झाला. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करीत ‘मोदी हाय हाय… विद्यार्थ्यांना न्याय द्या’, ‘जब जब मोदी डरते है, पुलिस को आगे करते है’, ‘चौकीदार चोर है’ अशा घोषणांनी शिवसेनेसह विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले.

सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नसल्याचे सांगत विरोधकांनी सभागृह सुरू होताच घोषणाबाजी सुरू करून दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दिला. शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी आदी विरोधकांनी बॅनर झळकावत मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ‘पेपरफुटी बंद करा, विद्यार्थ्यांना न्याय द्या’, ‘चोर है, चोर है, मोदी सरकार चोर है’, ‘खुनी है खुनी है, मोदी सरकार खुनी है’अशा घोषणा देत विरोधकांनी संपूर्ण सभागृह दणाणून सोडले. परंतु याला सभागृहामध्ये सत्ताधारी भाजप व शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्याची हिंमत झाली नाही. घोषणा सुरू असतानाही महापौर रितू तावडे यांनी सभागृहाचे कामकाज गोंधळातच पार पाडले.

सभागृहाबाहेर सत्ताधारी विरोधक आमने-सामने

सभागृह संपल्यानंतरही सत्ताधारी विरोधक आमने-सामने आले. यावेळीदेखील विरोधकांनी भाजप सरकारचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधाऱ्यांकडूनही यावेळी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे सभागृह संपल्यानंतरही एक तास वातावरण तणावपूर्ण बनले होते. विरोधकांनी सभागृहाबाहेर ठिय्या मारल्याने सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकही अडकून पडले. अखेर सत्ताधारी व विरोधकांमध्ये चर्चा झाल्यानंतर घोषणाबाजी बंद झाली.

मुंबईत आजही ठिकठिकाणी आंदोलनं, 150 आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडले; 47 जणांवर गुन्हे दाखल

सीजेएच्या समर्थनार्थ आजही मुंबईत ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. जवळपास 150 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चुनाभट्टी व वडाळा पोलीस ठाणे येथे 47 आंदोलकांविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन आदी गुन्हे दाखल करण्यात आले.

मुंबईत आज सलग पाचव्या दिवशीही आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कसलीही पर्वा न करता उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभाग घेतला. ट्रॉम्बे, साकीनाका, मालवणी, दहिसर, बीकेसी, गोरेगाव, चारकोप, मानखुर्द, शिवडी, शिवाजी पार्क आदी पोलिसांनी सुमारे 150हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले आहे. तसेच या आंदोलनाच्या अनुशंगाने 47 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

तयारी आजची

आज संध्याकाळी तिरंगा घेऊन आंदोलन करण्यासाठी विद्यार्थी उत्सुक आहेत. मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी पार्क येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर उपस्थित राहण्यास विद्यार्थी मोठ्या संख्येने येणार आहेत.