
सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस थांबत नसल्याची तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी आज पालक आणि विद्यार्थ्यांच्या सोबत एसटीच्या विभाग नियंत्रकांना लेखी निवेदन दिले आहे. यावेळी युवासेना जिल्हायुवाधिकारी प्रसाद सावंत उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात साळुंखे यांनी म्हटले आहे की, रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप, शिवाजीनगर, सहकारनगर, आयटीआय आणि अभ्युदय नगर या बस स्टॉपवर सकाळी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी बसची वाट पाहत थांबतात. मात्र बस मुलांना बसमध्ये न घेताच पुढे निघून जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचणे शक्य होत नाही. सर्व बस स्टॉपवर थांबणाऱ्या विद्यार्थ्यांना बसमध्ये घेऊनच पुढे जावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.





























































