
नीट पेपरफुटीविरोधात जेन झी क्रांती घडली आणि या तरूणांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधांनांचा राजीनामा मिळवलाच. या विजयाच्या जल्लोष दिल्लीसह महाराष्ट्रातही पाहायला मिळाला. एकीकडे संपूर्ण देश विजयोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. कर्जत तालुक्यातील जलालपूर गावात नीटच्या फेरपरीक्षेतील कमी गुणांमुळे नैराश्यात आलेल्या 19 वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, अंकिता सुरेश सांगले असे मृत तरुणीचे नाव आहे. नीट परिक्षेचा पहिला पेपरफुटल्यानंतर झालेल्या फेरपरिक्षेत अंकिताला 166 गुण मिळाले. याच नैराश्यातून अंकिताने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. अंकिताने शनिवारी दुपारी घरातील सिलिंग फॅनला गळफास लावून जीवन संपवल्याची माहिती अंकिताचे वडील सुरेश सांगले यांनी दिली. अंकिताने नीट परीक्षेची जोरदार तयारी केली होती आणि तिला सुरुवातीला चांगले गुण मिळाले होते. मात्र, नीट परीक्षेत गैरव्यवहाराचे प्रकरणसमोर आल्यानंतर आणि फेरपरीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती. याप्रकरणी कर्जत पोलीस पुढील तपास करत आहेत.
मोदी आणि शहांचा राजीनामा घ्या- आकांक्षा चतुर्वेदीचे कुंटुंबीयांची मागणी
दुसरीकडे, नीट पेपरफुटी प्रकरणानंतर जीवन संपवलेल्या आकांक्षा चतुर्वेदीच्या पालकांनीही तीव्र संताप व्यक्त करत न्यायाची आणि भरपाईची मागणी केली आहे. आकांक्षाच्या आईने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर असमाधान व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच पेपर लीक प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि माझ्या मुलीला न्याय मिळावा,अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.























































