लोकलमधून पडलेल्या मुलीला पोलिसांमुळे मिळाले जीवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धावत्या लोकलमधून पडून गंभीर जखमी झालेल्या १४ वर्षीय मुलीला कर्जत रेल्वे पोलीस आणि होमगार्डच्या तत्परतेमुळे वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला आहे. ही घटना २० जुलै रोजी कर्जत-भिवपुरी रेल्वे स्थानकादरम्यान घडली होती.

सिद्धी हजारे (१४) ही मुलगी आपल्या कुटुंबीयांसह लोकलने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान तिला उलटी आल्याने ती दरवाजाजवळ गेली असता अचानक तोल जाऊन ती धावत्या लोकलमधून खाली पडली. भिवपुरी रेल्वे स्थानकावर लोकल आल्यानंतर या घटनेची माहिती समजताच होमगार्ड शेळके, यादव, मालुसरे आणि कांगणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे ट्रॅकवरून तब्बल ३ किलोमीटर धावत ते या मुलीपर्यंत पोहोचले. पोलीस आणि होमगार्डने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचार वेळेत मिळाल्यामुळे सिद्धीचे प्राण वाचले आहेत. कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण मतकर यांनी सिद्धीचे प्राण वाचवणाऱ्या पोलीस व होमगार्डचे अभिनंदन केले आहे.