आपण वारंवार हात धुणे का गरजेचे आहे, जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवसभर मोबाईल, पैसे, दरवाज्यांची हँडल्स आणि सार्वजनिक ठिकाणांवरील विविध वस्तूंना स्पर्श करताना हातांवर जंतू, विषाणू आणि इतर सूक्ष्मजीव जमा होतात. हेच दूषित हात डोळे, नाक किंवा तोंडाला लागल्यास संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे हात स्वच्छ धुण्याची सवय अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हात नीट न धुतल्यामुळे सर्दी, फ्लू, जुलाब, अन्नातून होणारे विषबाधा (फूड पॉइझनिंग) आणि इतर संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढतो.

हात धुण्याची योग्य पद्धत

स्वच्छ वाहत्या पाण्याने हात नीट धुणे गरजेचे. तसेच साबण लावून हाताचे तळवे, हातांचा मागील भाग, बोटांमधील जागा, नखांच्या खालील भाग आणि अंगठे किमान २० सेकंद चोळा.
त्यानंतर स्वच्छ पाण्याने हात धुऊन कोरड्या टॉवेलने किंवा एअर ड्रायरने सुकवा.

साबण आणि पाणी उपलब्ध नसल्यास किमान ६० टक्के अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझर वापरू शकता. मात्र, हातांवर स्पष्टपणे घाण असल्यास साबणाने हात धुणेच अधिक प्रभावी ठरते.

कोणत्या वेळी हात धुणे अत्यावश्यक

स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवण्यापूर्वी
शौचालय वापरल्यानंतर
खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर
आजारी व्यक्तीची सेवा करण्यापूर्वी व नंतर
कचरा, पाळीव प्राणी किंवा जखमेला स्पर्श केल्यानंतर