
खेळाडू म्हणून प्रतिस्पर्ध्यांना भिडणारे गौतम गंभीर प्रशिक्षक म्हणून मात्र आता स्वतःच प्रश्नांच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही प्रकारांत हिंदुस्थानी संघातील काही वरिष्ठ खेळाडूंनी बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकार्यांसमोर आणि माजी क्रिकेटपटूंसमोर गंभीर यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
माजी कर्णधार सुनील गावसकर, रवि शास्त्राr आणि अनिल कुंबळे यांच्यासारख्या दिग्गजांनी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे की, प्रशिक्षकाने खेळाडूंवर स्वतःची विचारसरणी लादण्याऐवजी त्यांच्या ताकदीचा योग्य वापर करणे अधिक महत्त्वाचे असते. संघात आत्मविश्वास निर्माण करणे आणि पराभवानंतर जबाबदारी स्वीकारणे हे प्रशिक्षकाचे प्रमुख कर्तव्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आता श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका गंभीर यांच्यासाठी ‘करो या मरो’ असेल. जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांच्या अनुपस्थितीत संघासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे श्रीलंकेत गंभीर यांची अग्निपरीक्षा असेल.



























































