
हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू अजित आगरकर निवड समिती अध्यक्ष बनले आणि त्यांचा कार्यकाळ चर्चेत राहिला. गौतम गंभीर प्रशिक्षकपदी आल्यावर तर संघाचा संपूर्णपणे कायापालटच झाला. नामांकित खेळाडूंना त्यांनी अस्थिर करून सोडले. त्यामुळे संघातील वातावरण बिघडल्याचे म्हटले जाऊ लागले, पण आता आगरकर यांना अध्यक्षपदाची खुर्ची सोडावी लागणार आहे. कारण आता बीसीसीआय नवीन निवड समिती अध्यक्षाच्या शोधात असल्याचे समोर येत आहे.
आगरकर यांना दिली होती मुदतवाढ
आगरकर यांचा बीसीसीआय बरोबरचा करार जून 2026 लाच संपुष्टात आला होता. पण त्यावेळी बीसीसीआय नवीन अध्यक्ष शोधण्याच्या तयारीला लागलेली नव्हती. त्यामुळे बीसीसीआयने आगरकरला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यामुळे आता सप्टेंबर महिन्यात आगरकरला ही खुर्ची रिकामी करावी लागणार आहे.
आगरकर यांच्यामुळे रोहित–विराटची निवृत्ती?
आगरकर यांच्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे म्हटले जात आहे. इंग्लंडच्या दौऱ्यापूर्वी रोहितकडून कसोटी संघाचे कर्णधारपद काढून घेतले, पण रोहितला हा निर्णय रुचला नाही आणि त्याने निवृत्ती पत्करली. त्यानंतर विराट संघाच्या नेतृत्वासाठी उत्सुक होता, पण त्याच्याबरोबर असं काही बोलणं निवड समितीबरोबर झालं की, त्यानेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, अशी चर्चा होती.
सूर्याला बनवलं हीरो ते झीरो…
रोहितनंतर टी-20 संघाचा कर्णधार कोण, असा प्रश्न विचारला जात होता आणि सर्वांनाच हार्दिककडे नेतृत्व सोपवले जाईल, असे वाटत होते. पण आगरकर यांच्या निवड समितीने सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवले. सूर्याचा कर्णधार म्हणून रेकॉर्ड चांगलाच राहिला होता. सूर्याने वर्ल्ड कपही जिंकवून दिला. पण त्याला विश्वविजेत्या कर्णधाराला वर्ल्ड कपनंतर संघातही स्थान न देण्याचा निर्णय आगरकर यांच्याच निवड समितीने घेतला. त्यानंतर हिंदुस्थानला आयर्लंड व इंग्लंडकडून लाजिरवाणे पराभव पत्करावे लागले.





























































