Kokan News – चिपळूण रेल्वे तिकीट खिडकी घराची इमारत जीर्ण अवस्थेत, खड्डेमय रस्त्यामुळे प्रवासी हैराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण शहराकडून रेल्वे स्टेशननजीक जाणाऱ्या रस्त्याची व तिकीट खिडकीच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, पर्यायी अनारक्षित तिकीट खिडकी नेहमीच बंद असते. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. या प्रकाराबाबत वाहनचालक तसेच प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने पूर्वी चिपळूण शहर-मुरादपूर दिशेने येणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीट खिडकीची इमारत बांधली होती. सुरुवातीला काही महिने या तिकीट खिडकीवरून प्रवाशांनी तिकिटे काढली आणि त्यामुळे त्यांची सोयही झाली. मात्र, कालांतराने मुरादपूर दिशेकडील ही तिकीट खिडकी बंद झाली. इतकेच नव्हे, तर आता या इमारतीत परप्रांतीय कामगार राहू लागले आहेत. हे कामगार कोणत्या ठेकेदाराचे आहेत, याचा उलगडा होत नाही आणि रेल्वे प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत आहे. गेल्या काही वर्षांत योग्य वापर न झाल्याने या इमारतीची मोठी दुरवस्था झाली असून, ती जीर्ण अवस्थेत पोहोचली आहे.

या इमारतीमधील तिकीट खिडकी बंद झाल्याने ‘कोकण रेल्वे अन्याय निवारण संघर्ष समिती’चे अध्यक्ष तथा माजी सभापती शौकत मुकादम यांनी आवाज उठवला होता; तरीही रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. यानंतर मुकादम यांनी चिपळूण शहराच्या बाजूने प्रवाशांसाठी तिकीट खिडकीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. त्याची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने चिपळूण शहराच्या बाजूकडील रेल्वे स्टेशन आवारात तिकीट घर सुरू केले. काही दिवस या तिकीट घरातून प्रवाशांनी तिकिटे काढली; मात्र सध्या तेही बंद अवस्थेत आहे. ‘केवळ प्रवाशांची समजूत काढण्यासाठीच हे तिकीट घर सुरू केले होते का?’ असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

दुसरीकडे, चिपळूण शहराकडून मुरादपूरमार्गे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत वाईट दुरवस्था झाली आहे. ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून, मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्ता चिखलमय झाला आहे. यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, या खड्डेमय रस्त्याबाबत प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.