
धारूरमध्ये महायुतीतील सत्ताधाऱ्यांमध्येच मोठा वाद निर्माण झाला आहे. येथील पंचायत समितीच्या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी स्थानिक भाजप नेते माधव निर्मळ यांना उद्घाटनासाठी बोलावल्याने नवा वाद पेटला. अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी भाजप नेत्याला उद्घाटनासाठी बोलावण्याचे कारण विचारताच अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.
राज्य पातळीवर महायुतीची सत्ता असली तरी स्थानिक पातळीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये कसे खटके उडतात, याचे उत्तम उदाहरण माजलगाव मतदारसंघातील धारूर येथे पाहायला मिळाले. गत विधानसभा निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रकाश सोळंके यांच्याविरोधात भाजप नेते माधव निर्मळ यांनी बंडखोरी केली होती. तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमधील वाद सर्वश्रुत आहे.
गेल्या आठवड्यात धारूर पंचायत समिती कार्यालयात पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागांतर्गत शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सुरुवातीला कोणताही राजकीय नेता उपस्थित नव्हता. मात्र, ऐनवेळी दूरध्वनीवरून भाजपचे स्थानिक नेते माधव निर्मळ यांना उद्घाटनासाठी पाचारण करण्यात आले. निर्मळ यांनी तत्काळ उपस्थित राहून कार्यक्रमाचे उद्घाटन केले व भाषणही ठोकले. कोणतेही अधिकृत पद नसताना माधव निर्मळ यांना उद्घाटनासाठी कोणी बोलावले? याचा शोध घेत आमदार प्रकाश सोळंके यांनी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 14 तारखेला या प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी स्वतः आमदार सोळंके उपस्थित राहिले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच जाब विचारला.
आमदारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर धारूर तालुक्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी डॉ. विजय फुणसे यांनी लेखी खुलासा प्रसिद्ध केला. या खुलाशात त्यांनी स्पष्ट केले की, “या प्रशिक्षण शिबिराला कोणत्याही राजकीय व्यक्तीला निमंत्रित करण्यात आले नव्हते. माधव निर्मळ हे स्वतःहून कार्यक्रमाला आले होते आणि त्यांनी स्वतःहूनच भाषण केले. कार्यालयाची ही चूक लक्षात आल्याने आम्ही हा खुलासा करत आहोत.” अधिकाऱ्यांच्या या खुलाशामुळे भाजपचा मोठा अवमान झाल्याची चर्चा मतदारसंघात रंगली असून, या राजकीय वादामुळे अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे.
























































