केंद्रातील रिक्त पदे 8.24 लाखांवर; 10 वर्षांत संख्या दुप्पट, सरकारी कंपन्यांमध्ये निम्मे कंत्राटी कर्मचारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दशकात केंद्र सरकारमधील रिक्त पदांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. 2015 मध्ये 4.21 लाख रिक्त पदे होती, जी 2024 मध्ये वाढून 8.24 लाख झाली आहेत. अनेक सरकारी कंपन्यांमध्ये निम्मे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत.

एकूण मंजूर पदांमधील रिक्त पदांचा वाटा 11.5 वरून 21 टक्क्यांपर्यंत वाढला. या कालावधीत विविध केंद्रीय विभागांमधील एकूण मंजूर पदांची संख्या 2.74 लाखांनी वाढली. तथापि, भरलेल्या पदांची संख्या 1.29 लाखांनी कमी झाली. सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी आहेत. हा आकडा 2015 मधील 18.6 टक्क्यांवरून 2025 मध्ये 49.1 टक्क्यांपर्यंत वाढला. 2015 मध्ये रेल्वेमध्ये एकही रिक्त पद नव्हते. 2024 मध्ये 2.40 लाख पदे (16.2टक्के) रिक्त आहेत. आरोग्य क्षेत्रातील रिक्त जागाही शून्यावरून 6 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत, अशी माहिती आरटीआयमधून उघड झाली आहे.

नियुक्त्या झाल्या पण…

गृह मंत्रालयात मंजूर पदांमध्ये अंदाजे 1,02,000 ने वाढ झाली, तर भरतीमध्ये अंदाजे 49,621 ने वाढ झाली. याचा अर्थ असा की, नियुक्त्या झाल्या, परंतु मंजूर पदांमध्ये खूप वेगाने वाढ झाली. परिणामी, रिक्त जागा 58,774 वरून 1,10,885 पर्यंत वाढल्या.

सरकारी विभाग रिक्त पदे भरण्यासाठी कर्मचारी आऊटसोर्स करण्याकरिता जीईएम (गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस) प्लॅटफॉर्मचा वापर करतात. गेल्या वर्षी विक्रमी 10 लाख कर्मचारी आऊटसोर्स करण्यात आले.

कोणत्या विभागात सर्वाधिक पदे रिक्त

संरक्षण (नागरी) विभागात सर्वाधिक 2.42 लाख रिक्त पदे आहेत. मंजूर पदांच्या तुलनेत रिक्त पदांचे प्रमाणही 31.9 टक्क्यांवरून 43.4 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. टपाल विभागातील रिक्त पदांमध्ये आठ पटींपेक्षा जास्त वाढ झाली आहे. टपाल विभागातील रिक्त पदांची संख्या 7,561 वरून 61,546 पर्यंत वाढली असून रिक्त पदांच्या दरात ही एक लक्षणीय वाढ आहे.

80 मंत्रालये आणि विभागांमध्ये 39,23,212 मंजूर पदे

केंद्रीय नागरी सेवकांच्या वेतन आणि भत्त्यांवरील खर्च विभागाच्या अहवालानुसार, 80 केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये 39,23,212 मंजूर पदे उपलब्ध आहेत. यापैकी 30,99,656 पदे भरलेली असून 8,23,556 पदे रिक्त आहेत. 2015 मध्ये, 36,49,468 मंजूर पदांपैकी 32,28,921 पदे भरलेली होती आणि 4,20,547 पदे रिक्त होती.